अकोला शहरातील ५०० वाहनांवर कारवाई; एक लाखांचा दंड वसूल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 12, 2018 01:24 PM2018-12-12T13:24:42+5:302018-12-12T13:24:53+5:30
मंगळवारी दिवसभर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी शहरातील २४ ठिकाणांवर वाहनांची अचाणक तपासणी करून तब्बल ५०० वाहन धारकांवर कारवाई केली.
अकोला - शहरातील बेताल वाहतुकीला ताळयावर आणण्यासाठी जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर आणि अतिरिक्त पोलीस अधीक्षक विक्रांत देशमूख यांच्या आदेशावरुन तसेच शहर पोलीस उपअधीक्षक उमेश माने पाटील यांच्या मार्गदर्शनात मंगळवारी दिवसभर वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी शहरातील २४ ठिकाणांवर वाहनांची अचाणक तपासणी करून तब्बल ५०० वाहन धारकांवर कारवाई केली. त्यांच्याकडून तब्बन एक लाख रुपयांच्यावर दंड वसूल करण्यात आला असून ही कारवाई पुढेही सुरुच राहणार असल्याचे पाटील यांनी स्पष्ट केले.
शहरात वाढत्या दुचाकी चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी व मंगळससूत्र चोरीचे गुन्ह्यांना आळा घालण्यासाठी गर्दीच्या असलेल्या शहरातील २४ ठिकाणी मुख्य चौकात नाकाबंदी लावण्यात आली होती. या नाकाबंदीमध्ये वाहनचालकांच्या मुळ परवाण्याची तपासणी करण्यात आली असून ज्यांच्याकडे परवाणा नाही अशा वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली. तसेच वाहनाचे दस्तावेज नसणारे वाहन ताब्यात घेण्यात आले असून त्यांचे मुळ दस्तावेज तपासून त्यांची वाहने सोडण्यात आली. यासोबतच ट्रिपल सीट वाहन चालविणे, सिग्नल तोडणे, अवैद्य प्रवासी वाहतूक करणे, प्रवासी क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी वाहतूक करणे, ग्रामीण व खासगी आॅटो परमिटचे उल्लंघन करणे, वाहन चालवितांना मोबाईलचा वापर करताना वाहन चालविणे अशा नियमांचे उल्लंघन करनारे वाहन चालकांविरुद्ध मोटार वाहन कायद्याच्या अंतर्गत कारवाई करण्यात आली. वाहतुक शाखेचे प्रमूख विलास पाटील यांनी दिवसभर ही मोहिम राबवून मोठी कारवाई करीत ५०० वाहन चालकांना दंड आकारला आहे.
आॅटोचालकांच्या बेशीस्तीला लगाम लावण्यासाठी वाहन चालकांवर कारवाईची मोहिम सुरुच राहणार आहे. यासाठी वाहतुक शाखेचे कर्मचारी मेहनत घेत असून प्रत्येक चौकात १४ तासांपेक्षा अधिक डयुटी करीत आहेत. शहरातील वाहतुक ताळयावर आणण्यासाठी लोकप्रतिनिधी व राजकीय पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी कारवाईत अडचण न आणता सहकार्य करावे.
- विलास पाटील
वाहतुक शाखा प्रमूख, अकोला.