वाहतुकीस अडथळा ठरणा-या ५५ जड वाहनांवर कारवाई
By admin | Published: June 20, 2017 04:40 AM2017-06-20T04:40:30+5:302017-06-20T04:40:30+5:30
वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण करणार्या जड वाहनांवर वाहतूक शाखा आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने सोमवारी संयुक्तपणे कारवाई केली. वाशिम बायपासवर परिसरात रोडवर उभ्या करण्यात आलेली जड वाहने आणि दुकाने थाटणार्यांवर ही कारवाई केल्याने पातूरकडे जाणार्या रोडने मोकळा श्वास घेतला.
शहरातून राष्ट्रीय महामार्ग क्र. सहा हा बाळापूरकडे जाणारा रस्ता व पातूरकडे जाणार्या रस्त्यावर दोन्ही बाजूंनी मोठय़ा प्रमाणात जड वाहने उभी करण्यात येतात. रस्त्याच्या दुतर्फा दिवस-रात्र उभ्या राहणार्या या वाहनांमुळे वाहतुकीला मोठा अडथळा निर्माण होतो. यासंदर्भात वारंवार तक्रारी झाल्यानंतरही थातूरमातूर कारवाई मनपा व वाहतूक शाखेतर्फे करण्यात येते; मात्र पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांच्या आदेशावरून शहर वाहतूक शाखेचे प्रमुख विलास पाटील आणि मनपाच्या अतिक्रमण विभागाने तब्बल ५५ जड वाहनांवर थेट कारवाई केली. या वाहनचालकांवर कारवाईचा दंडुका उगारल्यानंतर मोठा दंड वसूल करण्यात आला. यासोबतच या परिसरात थाटण्यात आलेली वाहन दुरुस्तीची दुकाने, पानटपर्यांवरही कारवाई करण्यात आली. पोलिसांच्या तगडा बंदोबस्त ठेवून ही कारवाई करण्यात आली. जड वाहनचालकांनी यापुढे सदर ठिकाणावर वाहने उभी न करण्याचे आश्वासन दिल्यानंतर त्यांची वाहने सोडण्यात आली.
पहिल्यांदा मोठी कारवाई
रस्त्याच्या दुतर्फा जड वाहने उभी करणार्यांची प्रचंड दादागिरी असल्याने मनपा प्रशासन आणि वाहतूक शाखेने आजपर्यंंत या जड वाहनांवर कारवाई केलेली नव्हती; मात्र पोलीस अधीक्षकांच्या आदेशानंतर वाहतूक शाखा प्रमुख विलास पाटील यांनी मनपा अतिक्रमण विभागाला सोबत घेऊन या रस्त्यावर उभ्या करणार्या ५५ जड वाहनांवर कारवाई केली. त्यांच्यावर सार्वजनिक ठिकाणी रहदारीस अडथळा निर्माण केल्यावरून कारवाई केली. रस्त्यावरील दहा दुकानांवरही प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.