अमरावती विभागातील ५८ खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

By admin | Published: February 9, 2016 02:20 AM2016-02-09T02:20:57+5:302016-02-09T02:20:57+5:30

यवतमाळ जिल्हय़ात २0 तर अकोला,वाशिम जिल्ह्यात ११ विक्रेत्यांवर कारवाई.

Action on 58 Food Vendors in Amravati Division | अमरावती विभागातील ५८ खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

अमरावती विभागातील ५८ खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर कारवाई

Next

राम देशपांडे / अकोला : निर्धारित वजनापेक्षा कमी प्रमाणात खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या अमरावती विभागातील ५८ विक्रेत्यांवर वैधमापनशास्त्र (वजनमापे) विभागाने शनिवारी कारवाई केली. विभागातील पाच जिल्हय़ांत एकाच दिवशी राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत सर्वाधिक यवतमाळ जिल्हय़ातील व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली असल्याची माहिती वैधमापनशास्त्र विभागाचे प्रभारी उपनियंत्रक डॉ. एल. बी. हारोडे यांनी दिली. वैधमापनशास्त्र विभागाचे विशेष महानिरीक्षक तथा नियंत्रक अमिताभ गुप्ता यांच्या आदेशानुसार विभागीय उपनियंत्रक डॉ. एल.बी. हारोडे यांच्या मार्गदर्शनात विभागातील अमरावती, यवतमाळ, अकोला, वाशिम व बुलडाणा या पाच जिल्हय़ांत शनिवारी राबविण्यात आलेल्या या मोहिमेंतर्गत निर्धारित वजनापेक्षा कमी प्रमाणात खाद्य पदार्थांची विक्री करणार्‍या व्यावसायिकांवर कारवाई करण्यात आली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी वैधमापनशास्त्र विभागाच्या वतीने मिष्ठान्न खरेदी करण्यासाठी बनावट ग्राहकांचा आधार घेण्यात आला. यामध्ये नियोजित वजनापेक्षा कमी प्रमाणात मिष्ठान्न पदार्थांची विक्री करणार्‍या २४ विक्रेत्यांवर व मिष्ठान्न पदार्थांचे वजन करण्यासाठी अप्रमाणित उपकरणांचा वापर करणार्‍या २५ विक्रेत्यांवर, तसेच अधिनियम २0११ चे उल्लंघन करणार्‍या ९ खाद्य पदार्थ विक्रेत्यांवर वैद्यमापनशास्त्र अधिकार्‍यांनी कारवाई केली. या मोहिमेंतर्गत डबाबंद मिठाई विकणार्‍या अनेक व्यावसायिकांकडे निश्‍चित वजनाचा अभाव, तसेच त्यातील पदार्थांचे विवरण नसल्याचे आढळून आले. विभागात सर्रास सुरू असलेल्या या प्रकारावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ग्राहकांनी जागृत राहण्याची नितांत गरज असल्याचे अधिकार्‍यांनी स्पष्ट केले असून, यासंदर्भात ग्राहकांनी आपल्या सूचना व तक्रारी 0२२-२२८८६६६६ या हेल्पलाइन क्रमांकावर नोंदविण्याचे आवाहन वैधमापनशास्त्र विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.

विभागात करण्यात आलेली कारवाई

जिल्हा            कारवाई

अकोला-वाशिम      ११

बुलडाणा               १६

यवतमाळ            २0

अमरावती             ११

एकूण                    ५८

Web Title: Action on 58 Food Vendors in Amravati Division

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.