विनामास्क वावरणाऱ्या २४ जणांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2021 04:18 AM2021-03-19T04:18:17+5:302021-03-19T04:18:17+5:30
नागठाण्यात बेबी केअर किटचे वितरण मूर्तिजापूर : तालुक्यातील नागठाणा येथील अंगणवाडीमध्ये प्रसूती झालेल्या महिलांना बेबी केअर किटचे बुधवारी वितरण ...
नागठाण्यात बेबी केअर किटचे वितरण
मूर्तिजापूर : तालुक्यातील नागठाणा येथील अंगणवाडीमध्ये प्रसूती झालेल्या महिलांना बेबी केअर किटचे बुधवारी वितरण करण्यात आले. यावेळी रंभापूरचे सरपंच प्रशांत इंगळे, ग्रामपंचायत सदस्य हरिदास सोळंके, आरोग्यसेविका ज्योती रोठे, अंगणवाडी सेविका रूपाली अनभोरे, वृषाली देशमुख, अर्चना चव्हाण, अंकिता अनभोरे, प्रीती भोसले, गौतम अनभोरे उपस्थित होते.
आळंदा येथे विद्यार्थ्यांना गणवेशाचे वाटप
बार्शीटाकळी : आळंदा येथील जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थ्यांना शाळा व्यवस्थापन समितीच्या वीणा मोहोड यांच्या हस्ते गणवेश वितरण करण्यात आले. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे उपाध्यक्ष गोपाल नवलकार, सुशीला नागे व शाळेचे मुख्याध्यापक, शिक्षक उपस्थित होते.
बोरगाव मंजू येथे १० जण पॉझिटिव्ह
बोरगाव मंजू : बोरगाव मंजू येथे १६ मार्च रोजी नागरिकांची चाचणी करण्यात आली. चाचणीदरम्यान गाव व परिसरातील १० जणांचा अहवाल कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. आतापर्यंत कोरोनाबाधितांची संख्या ५४ वर पोहोचली आहे. त्यामुळे नागरिकांनी खबरदारी घेण्याचे आवाहन ग्रामपंचायतने केले आहे.
हिवरखेड येथे घराला आग
हिवरखेड : गावातील वॉर्ड क्रम २ मधील एका घराला १७ मार्च रोजी दुपारी अचानक आग लागली. प्रदीप इंगळे यांच्या घरातील स्वयंपाकघरातील खोलीला आग लागल्याने खोलीतील साहित्य जळून खाक झाले. ग्रामस्थांनी पाण्याचा मारा करून आगीवर नियंत्रण मिळविले.
सुकळी येथे संत नामदेव महाराजांचे पूजन
बोर्डी : सुकळी येथे महाशिवरात्रीनंतर येणाऱ्या पहिल्या बुधवारी संत नामदेव महाराज यात्रा होत असते. परंतु यंदा कोरोनामुळे यात्रा उत्सव रद्द करण्यात आला. विश्वस्त मंडळींनी १० मार्च रोजी पूजाअर्चा करून तीर्थस्थापना केली. ग्रामस्थांनी संत नामदेव महाराजांच्या समाधीचे दर्शन घेतले.
कोरोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाकडे दुर्लक्ष
चोहोट्टा बाजार : कोरोनाचा प्रादुर्भाव सातत्याने वाढत आहे. दररोज कोरोनाबाधित रुग्णांची संख्या वाढत आहे. अशा परिस्थितीतही नागरिक बेफिकीर होत वावरत आहेत. विनामास्क नागरिक फिरत आहेत. फिजिकल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाल्याचे चित्र आहे. पोलीस प्रशासनही बघ्याची भूमिका घेत आहेत.
खतांच्या दरवाढीने शेतकरी चिंतेत
पिंजर : सेंद्रीय खत, शेण खताच्या तुलनेत शेतकरी रासायनिक खतांचा वापर मोठ्या प्रमाणात करीत आहेत. रासायनिक खतांशिवाय पर्याय उरला नाही. आता तर रासायनिक खतांचे दर २०० ते ३०० रुपयांनी वधारले आहेत. त्यामुळे शेतलागवडीच्या खर्चात वाढ झाली असून, शेतकऱ्यांच्या चिंतेत भर पडली आहे. शासनाने खतांचे दर कमी करण्याची मागणी होत आहे.
रस्ता अपघातात दुचाकीस्वार जखमी
बार्शीटाकळी : बार्शीटाकळी ते पिंजर रोडवर दोनद बु. येथील केशव कावरे यांच्या दुचाकीला मागाहून येणाऱ्या भरधाव दुचाकीने धडक दिली. यात कावरे जखमी झाले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. धडक देणाऱ्या दुचाकीस्वाराविरुद्ध पोलिसात तक्रार देण्यात आली.
चतारी येथे ७ जण पॉझिटिव्ह
चान्नी : चतारी येथे रॅपिड टेस्ट करण्यात येत आहेत. टेस्ट दरम्यान गावातील ७ व्यावसायिकांचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. त्यामुळे गावात भीतीचे वातावरण आहे. सस्ती प्राथमिक आरोग्य केंद्राचे वैद्यकीय अधिकारी डॉ. नीलेश गाडगे, डॉ. महेविश, डॉ. जी.जे. लोखंडे, राजेश मानकर, संजय चावरिया रॅपिड टेस्ट करीत आहेत. ग्रामस्थांनी खबरदारी घ्यावी.
विद्यार्थ्यांना शालेय पाेषण आहाराचे वितरण
अकोट : बोर्डी येथील जिल्हा परिषद शाळेत यावर्षीच्या शैक्षणिक सत्रातील शालेय पोषण आहाराचे विद्यार्थ्यांना वितरण करण्यात आले. येथील जिल्हा परिषद मराठी शाळेत इ. पहिली ते आठवीच्या २३८ विद्यार्थ्यांच्या पालकांना शालेय पोषण आहार देण्यात आले. यावेळी मुख्याध्यापक चोरे व शिक्षक उपस्थित होते.
धार्मिक कार्यक्रमांना परवानगी द्या
तेल्हारा : धार्मिक कार्यक्रम सुरू करण्याची परवानगी देण्याची मागणी बुधवारी विश्व वारकरी सेनेतर्फे तहसीलदारांना दिलेल्या निवेदनातून करण्यात आली. यावेळी तालुकाध्यक्ष हभप पवन महाराज खुमकर, संजय भोपळे, हिंगणकर, संकेत खुमकर, अक्षय पांडुरंग वसे उपस्थित होते.