थकबाकीदारांवर कारवाईचा बडगा; दहा हजारावर वीजग्राहकांचा वीज पुरवठा खंडीत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 10, 2019 06:41 PM2019-03-10T18:41:06+5:302019-03-10T18:41:12+5:30
अकोला: महावितरणच्या अकोला परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील एकूण ४९ हजार २६६ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी २६लाख ३४ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे थकीत देयकाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली आहे
अकोला: महावितरणच्याअकोला परिमंडळातील घरगुती, व्यावसायिक आणि औद्योगिक या वर्गवारीतील एकूण ४९ हजार २६६ ग्राहकांकडे वीज देयकाचे ३६ कोटी २६लाख ३४ हजार रुपये एवढी थकबाकी प्रलंबित असल्यामुळे थकीत देयकाच्या वसुलीसाठी मोहीम उघडली आहे. सदर ग्राहकांचा नियमानुसार वीज पुरवठा खंडित करण्यात येत असून यामध्ये माहे फेब्रुवारीत ९ हजार ७०० तर मार्चमध्ये आतापर्यंत १ हजार ७०० थकबाकीदार ग्राहकांचा विदयुत पुरवठा तात्पुरता तथा कायमस्वरूपी खंडित करण्यात आला आहे.
थकबाकीदारांचा वीजपुरवठा खंडित करण्याची मोहीम महावितरणतर्फे संपुर्ण परिमंडळात जोरदारपणे राबविली जात आहे, यासंदर्भात शाखा, उपविभाग, विभागनिहाय अभियंते, अधिकारी, कर्मचारी, जनमित्र यांच्या बैठका घेण्याचे सत्र सुरु असून वरिष्ठ कार्यालयाकडून सुद्धा दैनदिन आढावा घेतल्या जात आहे. सुट्ट्यांच्या दिवशी वीजबिलाचा भरणा कसा करायचा असा प्रश्न अनेक वीज ग्राहकांना भेडसावत आहे. ग्राहकांच्या या चिंतेचे निराकरण महावितरणने फार पुर्वीपासून केले असून, वीज बील भरणा केंद्रांसोबत इतरही अनेक पर्याय वीज बील मिळण्यासोबतच वीज बिलांचा भरणा करण्यासाठी उपलब्ध करून दिले आहेत.
पारंपारिक वीजबिल भरणा केंद्राच्या अनेक मयार्दा असतात, ही केंद्रे शासकीय सुटीच्या दिवशी आणि कार्यालयीन वेळेनंतर बंद असतात यावर पर्याय म्हणून महावितरणने २४ तास सुरु असलेले महावितरण मोबाईल अॅप हे सर्वाधिक सशक्त पर्याय आहे. राज्यातील लाखो वीजग्राहकांनी हे अॅप डाऊनलोड करून त्याचा वापर सुरु केला आहे. यामुळे मोबाईल अॅपमुळे महावितरणची ग्राहकसेवा एका क्लिक्वर उपलब्ध झाली आहे. याशिवाय महावितरणच्या संकेतस्थळावरुनही आॅनलाईन वीज बिल भरणा करण्याची सुविधा २४ तास आहे.
महावितरणने थकबाकीदार ग्राहकांविरुद्ध जोरदार मोहिम उघडली असून त्यामुळे नियमानुसार थकबाकीदार ग्राहकांचा वीज पुरवठा खंडित करण्यात येणार आहे, यामुळे ग्राहकांना विजेपासून वंचित राहावे लागू शकते, त्यामुळे थकबाकीदार ग्राहकांनी वीज बिलाचा भरणा वेळेत करून सहकार्य करण्याचे आवाहन महावितरणने ग्राहकांना केले आहे.