एका वर्षात जिल्ह्यातील आठ कुंटणखान्यांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 26, 2019 03:10 PM2019-08-26T15:10:32+5:302019-08-26T15:10:41+5:30
उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या आठ देहव्यापाराच्या अड्ड्यांचे अकोला पोलीस प्रशासनाने एका वर्षात कंबरडे मोडले.
अकोला : शहरातील प्रतिष्ठितांच्या ठिकाणी असलेल्या जठारपेठ, बलोदे ले-आउट, मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनी, देवराव बाबा चाळ, मलकापूर रोडवरील अंबिका नगर, जुने शहरातील पार्वती नगरसारख्या उच्चभ्रू वस्त्यांमध्ये सुरू असलेल्या आठ देहव्यापाराच्या अड्ड्यांचे अकोला पोलीस प्रशासनाने एका वर्षात कंबरडे मोडले.
कौटुंबिक परिस्थिती, हायफाय शौक पूर्ण करण्यासाठी मजबुरी तसेच ब्लॅकमेलिंग या विविध कारणांमुळे वेश्या व्यवसायात ओढल्या गेलेल्या युवतींवर दबाव टाकून हा व्यवसाय करण्यात येत असल्याचेही शहरासह जिल्ह्यातील आठ ठिकाणांच्या कारवायांवरून समोर आले आहे. मलकापूर रोडवरील अंबिका नगरमध्ये एका शिक्षकाच्या घरातच देहविक्रय अड्डा सुरू असताना सदर शिक्षकाने मात्र याकडे कानाडोळा करीत या धंद्याला मूकसंमती दिली होती. त्यानंतर येवता येथील एका घरात असलेल्या दोन युवती या नागपूर जिल्ह्यातील असल्याचे समोर आले असून, तेथील एजंटद्वारे त्यांना अकोल्यात पाठविण्यात आले होते, तर जठारपेठेतील ज्योती नगरातील कुंटणखान्यामध्ये तीन युवतींना ताब्यात घेण्यात आले होते. यासोबतच समता कॉलनीत एका आलिशान बंगल्यात सुरू असलेल्या कुंटणखान्यातील तीन महिला केवळ कौटुंबिक परिस्थिती व उदरनिर्वाहासाठी या व्यवसायात ओढल्या गेल्याची माहिती आहे. डाबकी रोडवर आढळलेली पीडित युवती मात्र शौकाखातर या व्यवसायात आल्याची माहिती सूत्रांनी दिली. देवराव बाबा चाळीमध्ये एका घरातून अटक केलेल्या दोन मुलीही केवळ त्यांचे व्यसन पूर्ण करण्यासाठी या धंद्यात उतरल्या होत्या. मोठी उमरीतील इंजिनिअरिंग कॉलनीत सुरू असलेल्या कुंटणखान्यावर तर थक्क करणारी माहिती समोर आली असून, या ठिकाणावर महाविद्यालयातील तरुणीच मोठ्या प्रमाणात सहभागी असल्याचे पोलीस तपासात समोर आले होते. त्यानंतर विशेष पथकाने बलोदे ले-आउटमधील आरोग्य नगरमध्ये केलेल्या कारवाईत तीन मुली व महिला या कुटुंबाचा उदरनिर्वाह तसेच वैयक्तिक आयुष्य मजेत जगण्यासाठी हा व्यवसाय करीत असल्याची माहिती उघड झाली आहे. एका वर्षात पोलिसांनी धाडसत्र राबवून या अड्ड्यांचा नायनाट करण्याचा प्रयत्न केला असून, त्यानंतर आता हे अवैध धंदे पोलिसांच्या रडारवर आहेत.