पाच अवैध सावकारांविरुद्ध कारवाई; १.४० लाखाच्या रोकडसह १०० ग्रॅम सोने, दस्तऐवज जप्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 29, 2018 01:31 PM2018-12-29T13:31:19+5:302018-12-29T13:34:06+5:30
अकोला: शहरासह व्याळा येथील पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून पाच अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाच्या पथकांनी शुक्रवारी कारवाई केली.
अकोला: शहरासह व्याळा येथील पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून पाच अवैध सावकारांविरुद्ध जिल्हा उपनिबंधक (डीडीआर) कार्यालयाच्या पथकांनी शुक्रवारी कारवाई केली. त्यामध्ये १ लाख ३९ हजार ७२० रुपयांच्या रोकडसह १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तावेज जप्त करण्यात आले.
जिल्हा उपनिबंधक जी.जी. मावळे यांच्यासह पाच पथकांनी अकोला शहरातील चार ठिकाणी आणि व्याळा येथील एका ठिकाणी अवैध सावकारांच्या घरावर धाडी टाकल्या. त्यामध्ये अकोल्यातील रामदासपेठ भागात श्यामकुमार सुंदरलाल लोहिया, डाबकी रोडस्थित गणेश नगरमधील डॉ. गणेश शिवराम मेहरे, निमवाडीमधील नानक नगरमध्ये मीरा दयाराम फुलवानी, वाशिम रोड बायपास येथील गजानन शालीग्राम शिरसाट यांच्या घरी धाडी टाकण्यात आल्या. त्यामध्ये अवैध सावकारांच्या घरातून रोख १ लाख ३९ हजार ७२० रुपये, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने आणि अवैध सावकारी व्यवहाराचे दस्तावेज जप्त करून, संबंधित अवैध सावकारांविरुद्ध कारवाई करण्यात आली. सकाळी १० वाजतापासून रात्री ९.३० वाजेपर्यंत धाड पथकांकडून ही कारवाई करण्यात आली.
जप्त केलेला असा आहे मुद्देमाल!
अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून मुद्देमालासह दस्तऐवज जप्त करण्यात आले. त्यामध्ये श्यामकुमार लोहिया यांच्या घरातून अवैध सावकारी व्यवहाराचे ६७ खरेदी खते व विक्री पावती, ५ मुखत्यारपत्र, १०० व ५०० रुपयांचे कोरे बॉण्ड, १ समझोता लेख, १ इसार पावती, ४ ताबा पावती, १ टोकन पावती, २८ सात-बारा व फेरफार. डॉ. गणेश मेहरे यांच्या घरातून ११५ खरेदी खते, ३८ कोरे बॉण्ड, २३ इसार पावती, ९३ धनादेश, २२ ठोका पावत्या, ४ नोंदी रजिस्टर, ४ बँक पासबुक, सोनाराला व्याजाने पैसे दिल्याच्या ५५ पावत्या, १ करारनामा, वाहनाचे १ आरसी बुक, मीरा फुलवाणी यांच्या घरातून ६ इसार पावत्या, १२ कोरे धनादेश, ४ नोंदी रजिस्टर, वाहनांचे ३ आरसी बुक, १ लाख ४ हजार ५२० रुपये रोख रक्कम, १०० ग्रॅम सोन्याचे दागिने. सचिन वानखडे यांच्या घरातून १ कोरा बॉण्ड, तर गजानन शिरसाट यांच्या घरातून ४ कोरे बॉण्ड, ७ कोरे धनादेश, १ नोंदी रजिस्टर व ३५ हजार २०० रुपये रोख रक्कम जप्त करण्यात आली.
विविध पाच ठिकाणी अवैध सावकारांच्या घरांवर धाडी टाकून कारवाई करण्यात आली. अवैध सावकारीच्या व्यवहारातील दस्तऐवज, धनादेश व रोख रक्कम जप्त करण्यात आली असून, कागदपत्रांची पडताळणी करून यासंदर्भात संबंधित अवैध सावकारांविरुद्ध गुन्हे दाखल करण्याची कारवाई करण्यात येणार आहे.
- जी.जी. मावळे
जिल्हा उपनिबंधक (सहकारी संस्था)