मांडूळ तस्करांवरील कारवाईचे गौडबंगाल; स्थानिक अधिकारी व वन विभाग अनभिज्ञ
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 28, 2018 01:44 PM2018-02-28T13:44:00+5:302018-02-28T13:45:26+5:30
मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी काळ्याबाजारात दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली होती.
अकोला : मेळघाट व्याघ्र प्रकल्पाच्या अधिकाऱ्यांनी १० फेब्रुवारी रोजी काळ्याबाजारात दीड कोटी रुपये किंमत असलेल्या मांडूळ सापाची तस्करी करणाऱ्या चौघांना अटक केली होती; मात्र धाड टाकण्याचे ठिकाण व कारवाईबाबत गौडबंगाल निर्माण झाले असून, स्थानिक अधिकारी व वन विभागाला यापासून अनभिज्ञ ठेवण्यात आले. तसेच सदर प्रकरणाचा तपास वन विभागाकडे न देता थेट पोलिसांकडे देण्यात आल्याने संशय निर्माण होत असल्याची चर्चा आहे.
मेळघाट टायगर सेलचे अधिकारी विशाल माळी यांनी दर्यापूर तालुक्यातील सामदा येथे धाड टाकून तस्करी करण्यात येत असलेला मांडूळ साप जप्त करून चार जणांना अटक केली होती. या अधिकाºयांकडून घटनास्थळ दर्यापूर तालुक्यातील सामदा दाखविले; मात्र सदर धाड चोहोट्टा बाजार येथे टाकण्यात आल्याचे यावेळी ताब्यात घेण्यात आलेल्या तरुणाने सांगितले. त्यामुळे नेमके घटनास्थळ कोणते, असा संभ्रम निर्माण होत आहे. तसेच व्याघ्र प्रकल्पाच्या पथकाने सदर कारवाई करताना वन विभागाच्या स्थानिक अधिकाºयांना अंधारात ठेवले. धाड टाकणारे अधिकारी दोन दिवस वन विभागाच्या विश्रामगृहात मुक्कामी होते; मात्र याबाबत स्थानिक अधिकाºयांना पुसटशी कल्पनाही देण्यात आली नसल्याची चर्चा आहे. चोहोट्टा बाजार येथे धाड टाकल्यानंतर येथील पेट्रोल पंपावर काम करणाºया एका कर्मचाºयाला ताब्यात घेतले. सदर पेट्रोल पंपाच्या मालकाने पोलिसांशी संपर्क साधून सदर कर्मचाºयाला का ताब्यात घेतले, असा प्रश्न उपस्थित केला. त्यामुळे पेट्रोल पंपावर काम करणाºया युवकाला चुकीने ताब्यात घेतल्याचे लक्षात आल्यानंतर सोडण्यात आले.
अमरावती जिल्ह्यातील कारवाईही संशयाच्या भोवऱ्यात
अमरावती जिल्ह्यात मेळघाट व्याघ्र प्रकल्पातील अधिकाºयांनी वाघ व बिबटची कातडी जप्त केल्याचे घोषित केले होते; मात्र सदर कातडी ही वाघाची नसून बनावट होती. तसेच सदर घटनास्थळ मध्य प्रदेशातील असल्यावरही मोर्शी येथे गुन्हा दाखल करण्यात आला. वाघाच्या कातडी तस्करी प्रकरणात एका आरोपीला फरार दाखविण्यात आले होते; मात्र त्यानंतर या आरोपीचे मेडिकल करण्यात आले.