विनातिकिट प्रवासी, अनधिकृत विक्रेत्यांविरुद्ध कारवाई
By रवी दामोदर | Published: May 15, 2024 05:34 PM2024-05-15T17:34:39+5:302024-05-15T17:35:10+5:30
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक भूमिका घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबविली.
अकोला : सणासुदीच्या काळात सर्वच मार्गांवरील रेल्वे गाड्यांमध्ये गर्दी वाढली असल्याने या गर्दीचा फायदा घेत विनातिकीट प्रवास करणाऱ्यांचे प्रमाणही वाढले आहे. याशिवाय रेल्वे स्थानकांवर अनधिकृत विक्रेत्यांची संख्याही वाढली आहे. मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने १४ मे रोजी अकोला व इतर पाच रेल्वे स्थानकांवर कारवाई करत ५५१ प्रकरणांमध्ये २ लाख ९९ हजार ६६३ रुपयांचा दंड वसूल केला.
भुसावळ विभागीय रेल्वे व्यवस्थापक इति पाण्डेय यांच्या मार्गदर्शनाखाली अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक भूमिका घेत मध्य रेल्वेच्या भुसावळ विभागाने गेल्या काही दिवसांपासून विशेष मोहीम राबविली. व्यापक मोहीम पार पाडण्यासाठी वाणिज्य निरीक्षक, तिकीट तपासणी कर्मचारी आणि आरपीएफ कर्मचाऱ्यांची एक समर्पित टीम तयार करण्यात आली. १४ मे रोजी भुसावळ, खंडवा, बडनेरा, अकोला, मनमाड, नासिक रोड स्टेशन येथे अनधिकृत फेरीवाल्यांविरोधात कडक मोहीम राबविली. या मोहिमेमध्ये रेल्वे सुरक्षा बलाच्या आणि वाणिज्य विभागाचे संयुक्त पथक तयार करण्यात आले. ज्यामध्ये ३५ आरपीएफ अधिकारी आणि कर्मचारी आणि ५२ वाणिज्य विभागाचे कर्मचारी (वाणिज्य निरीक्षक आणि टीटीई) या कारवाईत सहभागी होते.