रुजू न होणा-या शिक्षकांवर निलंबनाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 7, 2017 02:37 AM2017-08-07T02:37:22+5:302017-08-07T02:37:22+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आंतरजिल्हा बदलीने येणाºया शिक्षकांना पदस्थापना देण्यात आल्यानंतरही ते रुजू होत नसल्यास त्यांच्यावर ७ आॅगस्ट रोजी निलंबनाची कारवाई करण्याचे आदेश शासनाने
५ आॅगस्ट रोजी दिले आहेत. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित लक्षात घेता हा निर्णय असला तरी अकोला जिल्हा परिषदेत शिक्षकांना गेल्या महिनाभरापासून पदस्थापनाच देण्यात आली नाही, हे विशेष.
आंतरजिल्हा बदलीने राज्यातील जिल्हा परिषदांमध्ये रुजू झालेल्या शिक्षकांना पदस्थापना देण्याबाबतच्या सूचना ७ जुलै, ३१ जुलै २०१७ रोजीच्या पत्रांतून दिल्या आहेत. त्यानुसार शिक्षण विभागाने कार्यवाही करणे आवश्यक होते; मात्र त्यानंतर महिनाभरातही आवश्यक ती माहिती न जुळवल्याने शिक्षकांना पदस्थापना आणि रुजू होण्यापासून रोखले जात आहे. पहिल्या टप्प्यात शासनाने राज्यातील जिल्हा परिषदेमध्ये असलेल्या शिक्षकांच्या आंतरजिल्हा बदल्यांचे आदेश दिले आहेत. त्यानुसार इतर जिल्ह्यांतून येणाºया शिक्षकांच्या आदेशाचा भडिमार सुरू आहे. त्यामध्ये अकोला जिल्हा परिषदेत रुजू करून घेण्यासाठी ५० पेक्षाही शिक्षकांचे आदेश आहेत. त्या शिक्षकांना समुपदेशनातून पदस्थापना देण्यासाठी ५ आॅगस्ट रोजी जिल्हा परिषदेत बोलावण्यात आले. समुपदेशनातून पात्र ठरणाºया शिक्षकांना योग्य जागी पदस्थापनेसाठी माहिती उपलब्ध नसल्याने काही शिक्षकांनी तक्रारी केल्या. त्यामुळे मुख्य कार्यकारी अधिकारी एस. रामामूर्ती यांनी माहिती तयार करून पदस्थापना देण्यासाठी मंगळवारी पुन्हा शिक्षकांना बोलावले.
गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्य
आंतरजिल्हा बदलीने आलेल्या शिक्षकांना पदस्थापना देताना शिक्षिकांपैकी गरोदर, स्तनदा मातांना प्रथम प्राधान्याने त्यांच्या पसंतीच्या जागेवर पदस्थापना देण्याचे बजावण्यात आले आहे. त्यासोबतच संवर्ग-१ मधील शिक्षकांची पदस्थापना करणे, त्यामध्ये दुर्धर आजारी, पाल्य गतिमंद असणे, दिव्यांग यांचा समावेश आहे. संवर्ग-२ मध्ये पती-पत्नी एकत्रीकरण, त्यांच्या गावातील अंतराची मर्यादा याबाबतची माहिती तर संवर्ग-३ मध्ये असलेल्य सर्वसाधारण शिक्षकांना उर्वरित ठिकाणी पदस्थापना दिली जाणार आहे.
पदस्थापनाच नाही, तर कारवाई कुणावर...?
शासनाच्या आदेशानुसार आंतरजिल्हा बदलीने पदस्थापना दिल्यानंतर रुजू न झालेल्या शिक्षकांना ७ आॅगस्ट रोजी निलंबित करण्याचे सांगितले आहे. अकोला जिल्ह्यात शिक्षकांना पदस्थापनाच दिली नाही तर ते रुजू कसे होणार, त्यामुळे सोमवारी कुणावर कारवाई करणार, हा पेच आहे. शिक्षक रुजू न झाल्यास कारवाई, त्याचवेळी रुजू करून न घेणे, पदस्थापना न देणाºया जिल्हा परिषद प्रशासनाचे काय करावे, हा प्रश्नही यानिमित्ताने उपस्थित होत आहे.