अवैध दारू विक्रीवर होणार कारवाई; ग्रा.पं.ने घेतला ठराव
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:23 AM2021-08-12T04:23:44+5:302021-08-12T04:23:44+5:30
वाडी अदमपूर : तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वाडी अदमपूर गावात दारूची अवैध विक्री होत आहे. दारूच्या व्यसनामुळे ...
वाडी अदमपूर : तेल्हारा पोलीस स्टेशनअंतर्गत येणाऱ्या वाडी अदमपूर गावात दारूची अवैध विक्री होत आहे. दारूच्या व्यसनामुळे अनेक संसार देशोधडीला लागत आहेत. गावात मद्यपींचे प्रमाण वाढल्याने भांडण-तंटेही वाढले आहेत. आता या मद्यपी व दारूची अवैध विक्री करणाऱ्यांना चाप बसणार आहे. ग्रा. पं. प्रशासनाने मासिक सभेत ठराव मंजूर करून अवैध दारू विक्री व वाद घालणाऱ्यांवर कारवाई होण्यासाठी पुढाकार घेतला आहे. याबाबत तेल्हारा पोलीस ठाणेदारांकडे निवेदन लेखी स्वरूपात केली आहे.
तेल्हारा तालुक्यातील वाडी अदमपूर येथे अवैध दारू विक्री राजरोसपणे सुरू आहे. तरुण पिढी व्यसनाधीन होत असून, अनेक संसार उद्ध्वस्त होत आहेत. अवैध दारू विक्री होत असल्याने मद्यपींचे प्रमाण वाढले आहे. मद्यपींकडून विनाकारण वाद उपस्थित करण्यात येतात. पोलीस प्रशासनाने याकडे लक्ष घालून गावातील अवैध दारु विक्री व्यवसाय बंद करण्यात पुढाकार घ्यावा, अशी मागणी होत आहे.
वाडी अदमपूर गट ग्रामपंचायतीच्या नुकत्याच पार पडलेल्या मासिक सभेत गावातील वाद निर्माण करणाऱ्या मद्यपींवर व अवैध दारू विक्रीवर कारवाई करावी, असा ठराव मंजूर करण्यात आला. सरपंच रुपेश राठी यांच्या अध्यक्षतेखाली पार पडलेल्या मासिक सभेत वेळेवर येणाऱ्या विषयासह पारित उपरोक्त ठराव सूचक रुपेश राठी, तर अनुमोदक मीना विष्णू शेळके आहेत.
-------------------------
गावात अवैध दारू विक्री सुरू आहे. गावात शांतता नांदावी, याकरिता आम्ही मासिक सभेत ठराव मंजूर करून अवैध दारू विक्री व वाद निर्माण करणाऱ्या मद्यपींवर कारवाई करण्याची मागणी केली.
- रुपेश राठी, सरपंच गट ग्रामपंचायत, वाडी अदमपूर.