डीजे वादकांवर कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 21, 2017 02:40 AM2017-07-21T02:40:48+5:302017-07-21T02:40:48+5:30
वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील डीजे वादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून आठ वाहने जप्त केली.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: श्रावण महिन्यातील कावड यात्रा, गणेशोत्सवामध्ये शहरातील बॅन्ड पार्टी चालक वाहनांवर क्षमतेपेक्षा अधिक आवाजामध्ये डीजे वाजवून ध्वनिप्रदूषणात भर घालतात. त्यामुळे वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरातील डीजे वादकांवर कारवाईचा बडगा उगारण्यात आला. वाहतूक पोलिसांनी ठिकठिकाणी कारवाई करून आठ वाहने जप्त केली.
शहरातील बॅन्ड पार्टी चालकांनी मोटार वाहन कायद्याचा भंग करून वाहनांना आकर्षक स्वरूप देऊन त्यात डीजे साउंड सिस्टीम बसविली आहे. याला उपप्रादेशिक पथकाची परवनगी नसतानाही शहरात मोठ्या प्रमाणात डीजे वाजविला जातो. कावड यात्रा, गणशोत्सवामध्येसुद्धा मोठ्या आवाजात डीजे वाजविला जातो. क्षमतेपेक्षा अधिक आवाजाला हरित लवादाने प्रतिबंध घालून त्याचे नियम ठरवून दिले आहेत. असे असतानाही बॅन्ड पार्टी चालकांकडून सर्रास उल्लंघन केल्या जाते. ही बाब लक्षात घेता, वाहतूक नियंत्रण शाखेचे प्रमुख विलास पाटील यांच्या मार्गदर्शनात गुरुवारी सायंकाळी वाहतूक पोलिसांनी डीजे वाहनांवर कारवाई धडका लावत, आठ वाहने जप्त केली. विना परवानगी डीजे वापरण्यात येणाऱ्या वाहनांची लांबी, रुंदी, उंची, वाढवून त्यावर मोठ-मोठे साउंड बॉक्स लावून मोठ्या आवाजाने ध्वनिप्रदूषण करण्यात येते. कावड यात्रा, पालखी सोहळा, गणपती उत्सवातसुद्धा येणारी आगामी सण उत्सवामध्येसुद्धा ध्वनिप्रदूषण नियंत्रण ठेवण्यासाठी बॅन्ड पार्टी चालकांविरुद्ध कारवाई करण्यात आली. तसेच पोलीस निरीक्षक विलास पाटील यांनी शहरातील बॅन्ड पार्टी मालकांची बैठक बोलावून त्यांना शहरात ध्वनिप्रदूषण कायद्याचे उल्लंघन केल्यास आणि रस्त्यावरील वाहतुकीस अडथळा केल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.