परीक्षेदरम्यान पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई
By admin | Published: March 21, 2017 02:36 AM2017-03-21T02:36:35+5:302017-03-21T02:36:35+5:30
गत काही दिवसांपासून बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत.
अकोला, दि. २0- गत काही दिवसांपासून बारावी व दहावीच्या परीक्षा सुरू आहेत. सोमवारी इयत्ता दहावीचा विज्ञान-२ विषयाचा पेपर होता. या पेपरदरम्यान शिक्षण विभागाच्या भरारी पथकांनी घातलेल्या धाडीमध्ये दोन परीक्षा केंद्रांवर कॉपी करताना आढळून आलेल्या पाच कॉपीबहाद्दरांवर कारवाई करण्यात आली. या विद्यार्थ्यांंना निलंबित करण्यात आले.
इयत्ता दहावीचा विज्ञान-२ विषयाचा पेपर सुरू असताना, दुपारी माध्यमिक शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांच्या भरारी पथकाने मूर्तिजापूर तालुक्यातील कुरूम येथील पंचशील विद्यालय परीक्षा केंद्रावर तीन विद्यार्थ्यांंना कॉपी करताना रंगेहात पकडले. शिक्षणाधिकार्यांनी या विद्यार्थ्यांंना निलंबित केले. तसेच महसूल विभागाच्या भरारी पथकाने तेल्हारा तालुक्यातील हिवरखेड येथील जिल्हा परिषद हायस्कूल परीक्षा केंद्रावर कॉपी करणार्या दोन विद्यार्थ्यांंवर निलंबनाची कारवाई केली. दहावी व बारावीच्या परीक्षेदरम्यान शिक्षण विभागाने आतापर्यंंत ७७ विद्यार्थ्यांंवर निलंबनाची कारवाई केली.
शिक्षकांवरही होणार कारवाई!
धाडीदरम्यान अनेक परीक्षा केंद्रावर कॉपीचा ऊत आलेला दिसून येत आहे. परीक्षा केंद्रांवर ठिकठिकाणी पुस्तके, गाईडसह चिठ्ठय़ा मिळून येत आहे. यावरून शिक्षक व केंद्रप्रमुख कॉपीमुक्ततेबाबत गंभीर नसल्याचे स्पष्ट होत आहे. परीक्षा केंद्रावर कॉपीचा प्रकार दिसून आल्यास शिक्षक व केंद्रप्रमुखांवर कडक कारवाई करण्याचा इशारा शिक्षणाधिकारी प्रकाश मुकुंद यांनी दिला आहे.