सट्टा माफियांवर कारवाई; चौथा आरोपी आला समोर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 30, 2017 02:24 AM2017-07-30T02:24:40+5:302017-07-30T02:24:40+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी रविवार, १८ जून रोजी भारत आणि पाकिस्तान यांच्यात खेळण्यात येत असलेल्या अंतिम सामन्यात न्यू तापडिया नगरातील पवन वाटिका येथे सुरू असलेल्या सट्टा माफियांवर पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने छापा टाकू न कारवाई केली होती. त्यानंतर सदर प्रकरणाचा तपास सिव्हिल लाइन पोलिसांकडून करण्यात येत असतानाच या प्रकरणात आणखी एक आरोपी समोर आल्याची माहिती पोलिसांनी दिली.
भारत आणि पाकिस्तान यांच्यात आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा अंतिम सामना खेळला गेला. या हायहोल्टेज सामन्यात जिल्ह्यात कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आला होता. न्यू तापडिया नगरमध्ये सट्ट्याचा हा बाजार मोठ्या प्रमाणात सुरू असल्याची माहिती हर्षराज अळसपुरे यांना मिळाली. त्यांनी पवन वाटिका येथून अकोल्यातील बडे सट्टा माफिया कल्पेश स्वरूपचंद अग्रवाल (३४) रा. गुलजारपुरा, ललित देवीदास सुरेखा (५५) रा. जुना भाजी बाजार जैन मंदिराजवळ आणि श्यामकुमार नरेशकुमार हेडा (४८) रा. बोरगाव खुर्द या तीन आरोपींना अटक केली होती. या आरोपींकडून १५ मोबाइल, टीव्ही, लॅपटॉप दुचाकीसह तीन लाख रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला; मात्र हे मोबाइल कुणाचे आहेत, याचा शोध अद्यापही पोलीस घेत आहेत. या प्रकरणात पाच डीलर्सची नावेही समोर आली होती, त्यांचाही अद्याप पोलिसांना शोध लागलेला नाही. पवन वाटिकेमध्ये ज्या घरात हा सट्टा बाजार सुरू होता, त्या घर मालकालाही आरोपी केलेले नाही, यासह अशा अनेक प्रकारची माहिती या प्रकरणात समोर आली नाही. त्यामुळे मूर्तिजापूरचे आ. हरीश पिंपळे विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित करून सदर प्रकरणात अशा त्रुटी का ठेवण्यात आलेल्या आहेत, असा सवाल उपस्थित केला आहे.
आ. पिंपळेंनी केला तारांकित प्रश्न
जप्तीतील १७ मोबाइल कुणाचे आहेत, पेन ड्राइव्ह जप्त करण्यात आला असून, त्यामध्ये काय आढळले, कोट्ट्यवधी रुपयांचा सट्टा लावण्यात आल्याची माहिती आहे, ती समोर आली आहेत का, अशा प्रकारचे प्रश्न आ. हरीश पिंपळे यांनी विधानसभेत उपस्थित केले आहेत. एकूणच या प्रकरणाच्या तपासात आणखी बड्या माफियांची नावे समोर येणार असून, पोलिसांनी त्या दिशेने सीडीआर आणि एसडीआर काढून तपास करण्याची मागणी केली.
सदर प्रकरणाचा तपास सुरू आहे. आणखी एक आरोपी समोर आला आहे. सदर प्रकरणात आणखी माहिती येणार आहे.
- अन्वर शेख,
ठाणेदार, सिव्हिल लाइन, अकोला.