गोंधळी मद्यपींवर १२ तासांत कारवाई
By admin | Published: April 20, 2017 12:51 AM2017-04-20T00:51:22+5:302017-04-20T00:51:22+5:30
अवैध धंदे, दारूबंदीसाठी ग्रामरक्षक दलाचा आधार
अकोला : दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्यांची माहिती मिळताच बारा तासांच्या आत पोलीस त्या व्यक्तीला पकडून गुन्हे दाखल करणार आहेत. त्यासाठी प्रत्येक गावात ग्रामरक्षक दल कायद्यानुसार स्थापन करण्याचे निर्देश गृह विभागाने पोलीस विभागासह उत्पादन शुल्क विभागाला मंगळवारी दिले आहेत.
अवैध दारू उत्पादन, वाहतूक, विक्री होत असल्यास या प्रकारांचे समूळ उच्चाटन करण्यासाठी दारूबंदी अधिनियम करण्यात आला आहे.
१६ जानेवारी २०१७ रोजी महाराष्ट्र दारूबंदी (सुधारणा) अधिनियम २०१६ प्रसिद्ध झाला आहे. त्यामध्येच ग्राम स्तरावर ग्रामरक्षक दल स्थापन करण्याची अधिसूचनाही २२ मार्च २०१७ रोजी प्रसिद्ध करण्यात आली. त्यावर अद्यापही कार्यवाही सुरू न झाल्याने गृह विभागाने १८ एप्रिल रोजी नव्याने आदेश दिले आहेत.
महाराष्ट्र दारूबंदी अधिनियमातील तरतुदीनुसार ग्रामरक्षक दलाने गावातील अवैध धंदे, दारू विक्री, वाहतूक करणे, जवळ बाळगणे याबाबतची माहिती पोलिसांना, उत्पादन शुल्क विभागाला द्यावयाची आहे. माहिती मिळताच संबंधित अधिकाऱ्यांनी तातडीने कारवाई करण्याचे आदेशात बजावण्यात आले आहे.
बारा तासांत कारवाई करा!
अवैध दारू उत्पादन, विक्रीसंदर्भात ग्रामरक्षक दलाने माहिती देताच पोलीस आणि उत्पादन शुल्क विभागाने १२ तासांच्या आत कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे बजावण्यात आले.
नशेत असल्याची वैद्यकीय तपासणी
गावात दारू पिऊन गोंधळ घालणारे, मारामारी करणाऱ्या व्यक्तीची माहिती पोलिसांना मिळताच तो नशेत असेपर्यंत शक्य तितक्या लवकर ताब्यात घेतले जाणार आहे. त्याची वैद्यकीय तपासणी करून महाराष्ट्र दारूबंदी कायद्यानुसार कारवाई केली जाईल.
सराईताला हद्दपारीचा प्रस्ताव
अवैध दारू निर्मिती, विक्री तसेच दारूविषयी गुन्हेगारी कृत्य करणाऱ्या सराईत व्यक्तीविरुद्ध कारवाई करताना चांगल्या वर्तणुकीचे हमीपत्र घेतले जाईल. सातत्याने हा प्रकार घडत असल्यास हद्दपारीची कारवाई प्रस्तावित होणार आहे. हा प्रस्ताव सादर न केल्यास संबंधित अधिकारी-कर्मचाऱ्यांवर कारवाई केली जाणार आहे.