कुख्यात गुंडाच्या टोळीवर कारवाई, सातव चौकातील हत्याकांड प्रकरणातील आरोपींचा समावेश
By सचिन राऊत | Published: September 26, 2022 07:27 PM2022-09-26T19:27:12+5:302022-09-26T19:27:32+5:30
अकोला जिल्ह्यातील गुंडाच्या टोळीवर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.
अकोला : जिल्हाभर टोळीने व स्वतंत्ररीत्या गुन्हे करणाऱ्या तसेच चिखलपुरा परिसरातील हत्याकांडात समावेश असलेल्या काही आरोपींसह त्यांच्या साथीदार असलेल्या कुख्यात गुंडांच्या टोळीवर अमरावती परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक चंद्रकीशोर मीना यांनी सोमवारी संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायद्याअंतर्गत कारवाई केली. पोलीस अधीक्षक जी श्रीधर यांनी या प्रस्तावाचा बारकाइने अभ्यास करून सादर केल्यानंतर या प्रस्तावाला मंजुरी देण्यात आली.
कुख्यात गुंडांच्या टोळीचा म्होरक्या सुहास सुरेश वाकोडे वय २५ वर्ष, ऋतीक सुधीर बोरकर वय २० वर्ष, गणेश राजु कॅटले वय २५ वर्ष, राहुल नामदेव मस्के वय २१ वर्ष, सोनू उर्फ विशाल सुनील मंदिरेकर वय २१ वर्ष, विशाल महादेव हीरोळे वय २२ वर्ष व दर्शन सुभाष नंदागवळी वय २३ वर्ष हे सात जण टोळीने गुन्हे करीत असून त्यांच्यावर हत्या करणे, प्राणघातक हल्ला करणे, जबरी चोरी करणे यासह अनेक गंभीर गुन्हे दाखल आहेत. या गुन्ह्यांमुळे त्यांच्यावर प्रतिबंधात्मक कारवाई करण्यात आली. मात्र या कारवाईला न जुमानता शहरात वर्चस्व स्थापन करण्यासाठी तसेच परिसरात दहशत निर्माण करण्यासाठी त्यांची गुन्हे करण्याची मालिका सुरुच असल्याने सिव्हील लाइन्स पोलीस, शहर पोलीस उपअधीक्षक यांच्या मार्फत अमरावती परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक मीना यांच्याकडे सातही गुंडावर संघठीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यासाठी प्रस्ताव सादर करण्यात आला. सातही गुंडावर सिव्हील लाइन्स पोलीस ठाण्यात ३०२, १२० ब, १४३, २०१, ३४, तसेच संघटीत गुन्हेगारी नियंत्रण कायद्याच्या विविध कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
हत्येसह अनेक गुन्हे
या टोळीतील गुंडावर हत्याकांडासह अनेक गुन्हे दाखल आहेत. मात्र त्यानंतरही त्यांची गुन्हेगारी सुरुच असल्याने मोक्का अंतर्गत कारवाई करण्यात आली आहे.