पालखी मार्गावर अनधिकृत स्वागत कमान, स्टेज उभारल्यास कारवाई; हौशी कार्यकर्त्यांना महापालिकेचा इशारा
By आशीष गावंडे | Published: August 22, 2023 06:38 PM2023-08-22T18:38:02+5:302023-08-22T18:38:17+5:30
सणासुदीच्या दिवसात शहरात जागोजागी अनधिकृत बॅनर्स, फलक लावल्या जातात.
अकोला : श्रावण महिना सुरु झाला की शहरातील प्रमुख रस्ते, मुख्य चौकांमध्ये पालखी व कावडधारी शिवभक्तांच्या स्वागतासाठी कमान, स्टेज व जागोजागा बॅनर,फलक लावण्याची जणू तरुणाइत स्पर्धा रंगते. यामुळे शहराचे विद्रुपीकरण हाेत असल्यामुळे अशा हौशी कार्यकर्त्यांना लगाम घालण्यासाठी मनपा प्रशासनाने
विनापरवानगी स्वागत कमान, स्टेज अथवा बॅनरबाजी केल्यास संबंधितांच्या नावानिशी कारवाइ करण्याचा इशारा दिला आहे.
सणासुदीच्या दिवसात शहरात जागोजागी अनधिकृत बॅनर्स, फलक लावल्या जातात. विविध राजकीय पक्षाचे कार्यकर्ते, सामाजिक संघटना व स्वयंघोषित समित्यांचे पदाधिकारी त्यांचे फोटो झळकाविण्याच्या नादात प्रमुख रस्ते, चौक तसेच इमारतींवर मनमानीरित्या भलेमोठे होर्डिंग्ज लावून हौस भागवतात. श्रावण महिन्यात दर सोमवारी अनेक पालखी व कावडधारी शिवभक्त पूर्णा नदीच्या जलाने आराध्य दैवत श्री राजराजेश्वराला अभिषेक करतात. त्यांच्या स्वागतासाठी ठिकठिकाणी स्वागत कमानी व स्टेज उभारल्या जातात. काही ठिकाणी शिवभक्तांसाठी चहा,नाश्ता,फराळ आदी व्यवस्था केली जाते. परंतु यासाठी महापालिकेच्या परवानगीकडे साफ कानाडोळा केला जातो. यामुळे शहराचे विद्रुपीकरण होण्यासोबतच वाहतूक व्यवस्थेला अडचण निर्माण होते. यापुढे संबंधितांनी मनपाकडे स्वतंत्रपणे परवानगी घेणे बंधनकारक करण्यात आले आहे.
शुल्क जमा करा, परवानगी घ्या!
शिवभक्तांसाठी स्वागत कमान, स्टेज व बॅनर लावण्यासाठी संबंधितांनी मनपात शुल्क जमा करुन स्वतंत्रपणे परवानगी घेण्याचे आवाहन प्रशासनाने केले आहे. प्रशासनाची परवानगी घेतली नसेल तर संबंधितांचे साहित्य जप्त करण्याची कारवाइ केली जाणार आहे.
रस्त्यांलगत अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट
श्रावण महिन्यातील शेवटच्या सोमवारी शहराचे आराध्य दैवत श्री राजरोश्वराला गांधीग्राम येथील पूर्णा नदीच्या जलाने अभिषेक करण्याची परंपरा आहे. यामध्ये पालखी व कावडधारी शिवभक्त उत्साहाने सामील होतात. त्यांच्या स्वागतासाठी शहरातील मुख्य रस्त्यांलगत आतापासूनच अनधिकृत होर्डिंग्जचा सुळसुळाट झाला आहे. यावर महापालिका कारवाइ करणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.