गंगानगर येथील अवैध बांधकामावर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 7, 2021 04:24 AM2021-07-07T04:24:34+5:302021-07-07T04:24:34+5:30
मिनी बायपासलगतच्या गंगानगर येथे मालमत्ताधारक मधुबाला मालेगावकर यांच्यातर्फे विकासक अब्दुल नासीर यांनी नियम धाब्यावर बसवून इमारतीचे बांधकाम ...
मिनी बायपासलगतच्या गंगानगर येथे मालमत्ताधारक मधुबाला मालेगावकर यांच्यातर्फे विकासक अब्दुल नासीर यांनी नियम धाब्यावर बसवून इमारतीचे बांधकाम केल्याचे समाेर आले. नगररचना विभागाकडून ३ हजार ५०० चाैरस फूट प्रस्तावाला बांधकाम परवानगी देण्यात आली हाेती. या ठिकाणी संबंधितांनी चक्क ५ हजार ५०० चाैरस फूट बांधकाम केल्याचे समाेर आले. यासंदर्भात मनपाकडून नाेटीस बजावण्यात आली. दरम्यान, मालमत्ताधारक इमारतीचा अनधिकृत भाग ताेडत नसल्याचे पाहून मंगळवारी मनपाने कारवाईला प्रारंभ केला. आयुक्त निमा अरोरा यांच्या आदेशान्वये सदर बांधकामावर निष्कासनाची कारवाई करण्यात आली. कारवाई करताना क्षेत्रीय अधिकारी राजेंद्र टापरे, जुने शहर पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक गणेश सूर्यवंशी, अतिक्रमण विभागाचे प्रवीण मिश्रा, चंद्रशेखर इंगळे, सुनील गरड, करण ठाकूर, रफीक अहमद, रूपेश इंगळे, वैभव कवाडे, योगेश कंचनपुरे, जय गेडाम, संतोष भगत, तेजराव बन्सोड, पवन चव्हाण आदी कर्मचारी उपस्थित हाेते.
कनिष्ठ अभियंता बघ्याच्या भूमिकेत
नगररचना विभागाने बांधकाम नकाशा मंजूर केल्यानंतर प्रत्यक्षात इमारतीचे बांधकाम नियमानुसार हाेते किंवा नाही, याची तपासणी करण्याची जबाबदारी या विभागातील कनिष्ठ अभियंत्यांची आहे. शहरात खुलेआम अवैध इमारती बांधल्या जात असताना कनिष्ठ अभियंते अर्थपूर्ण दुर्लक्ष करीत असल्याचे बाेलले जाते. यामध्ये महिला कर्मचारी तसूभरही मागे नाहीत. अशा कर्मचाऱ्यांना आयुक्त अराेरा वठणीवर आणतील का, याकडे लक्ष लागले आहे.