रूग्णांना सेवा देणाऱ्या मेडिकलवर कारवाई!

By admin | Published: June 8, 2017 01:40 AM2017-06-08T01:40:26+5:302017-06-08T01:40:26+5:30

संप काळात औषधे देणाऱ्यांना पाच हजारांचा दंड; केमिस्ट असोसिएशनचा अजब फतवा

Action on Medical Services Serving! | रूग्णांना सेवा देणाऱ्या मेडिकलवर कारवाई!

रूग्णांना सेवा देणाऱ्या मेडिकलवर कारवाई!

Next

सचिन राऊत ।
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : आॅनलाइन औषध विक्रीच्या शासनाच्या प्रस्तावित धोरणाविरुद्ध अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या मेडिकल बंद आंदोलनात सहभागी न होता रुग्णांना औषध सेवा पुरविणाऱ्या मेडिकल संचालकांवर अकोला केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने कारवाईचा दंडुका उगारला आहे. कोणतेही अधिकार नसताना केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मेडिकल सुरू ठेवणाऱ्यांना ५ ते १० हजार रुपयांचा दंड किंवा देणगी देण्याचा अजब फतवा काढला आहे.
देशातील केमिस्ट संघटनांनी ३० मे रोजी मेडिकल बंदची हाक दिली होती. जिल्ह्यात या बंदच्या आव्हानाला न जुमानता काही औषध विक्रेत्यांनी रुग्णांच्या सेवेसाठी औषध दुकाने उघडी ठेवली. त्यामुळे अकोला केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनचा बंद सपशेल अपयशी ठरला. याचा वचपा काढण्यासाठी ज्या औषध दुकान संचालकांनी त्यांची दुकाने उघडे ठेवून रुग्णांची गैरसोय होऊ नये म्हणून सेवा दिली. त्यांचा गौरव न करता हुकूमशाही पद्धतीने अकोला केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनने मेडिकल सुरू ठेवणाऱ्यांची एक यादी तयार करून त्यांना प्रत्येकी ५ ते १० हजार रुपयांचा दंड ठोठावला. दंड देणगी स्वरूपात देण्याचे आदेशही देण्यात आले.. केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशनला मेडिकल संचालकांना अशा प्रकारचे दंड आकारण्याचे अधिकार नसताना त्यांनी हा दंड आकारल्याने काही औषध दुकानाच्या संचालकांनी या प्रकाराची तक्रार राज्याचे अन्न व औषध प्रशासन मंत्र्यांसह प्रशासन विभागाच्या आयुक्तांकडे करण्याची तयारी चालविली आहे.

दंडाच्या कारवाईतही भेदभाव
केमिस्ट असोसिएशनने जिल्ह्यातील १३ मेडिकल संचालकांना ५ ते १० हजार रुपये दंड भरण्याची कारवाई केली आहे; मात्र असोसिएशनने तयार केलेल्या मेडिकलच्या यादीमध्ये शहरातील काही मेडिकल संचालकांना दंडाच्या कारवाईतून परस्पर वगळले आहे. त्यामुळे या दंडाच्या कारवाईत भेदभाव करण्यात आला आहे. ग्रामीण भागातील मेडिकल संचालकांवर दबाव टाकत त्यांना दंड देण्यात आला आहे.

असोसिएशनला अशा प्रकारे दंडाची कारवाई करण्याचे अधिकार नाहीत. अशा प्रकारे दंड वसूल करणे म्हणजे खंडणीचा प्रकार असून, सदर प्रकरणाची औषध दुकानदाराने तक्रार दिल्यास संबंधितांवर खंडणीचे गुन्हे दाखल करण्यात येतील. दंडाच्या रकमेची पावती दिली असली, तरी हा प्रकार अनधिकृत आहे, त्यामुळे तक्रार प्राप्त होताच कारवाई होईल.
- राजेंद्र पाटील,
सह-आयुक्त,अन्न व औषध प्रशासन विभाग, अकोला.

अखिल भारतीय औषध विक्रेता संघटनेने पुकारलेल्या मेडिकल बंदच्या काळात काही मेडिकल सुरू होती की नाही, याची माहिती घेण्यात आली. त्यांच्यावर कारवाई करण्यासंदर्भात चर्चा करण्यात येत आहे. मेडिकल दुकानदारांनी दाखविलेल्या पावत्यांची माहिती घेण्यात येईल.
- सुशील वोरा, अध्यक्ष,
केमिस्ट अ‍ॅण्ड ड्रगिस्ट असोसिएशन, अकोला.

Web Title: Action on Medical Services Serving!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.