वेगाने वाहन चालविणाऱ्या दीड हजार वाहनांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2020 04:29 PM2020-03-04T16:29:47+5:302020-03-04T16:29:58+5:30
शहर वाहतूक शाखेने नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा उपयोग करून कारवायांचा धडाका लावला आहे.
अकोला - वाहतूक शाखेचे प्रमुख गजानन शेळके यांच्या मार्गदर्शनात नवीन वर्षातील जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात तब्बल एक हजार ७०० वाहनांवर इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा वापर करून कारवाई करण्यात आली आहे. शहर वाहतूक शाखेने नवीन इंटरसेप्टर वाहनातील स्पीडगणचा उपयोग करून कारवायांचा धडाका लावला आहे.
शहरासह जिल्ह्यात वेळोवेळी मोहीम राबवून टपोरीगिरी करणारे, चालू वाहनांवर स्टंटबाजी करणारे, वेगाने वाहन चालविणारे, मोटरसायकलवर क्रमांक टाकण्याऐवजी भलतेच काही लिहिणारे वाहनचालक हेरून त्यांच्यावर कारवाई करण्यासाठी वाहतूक शाखेकडून मोहीम राबविण्यात येत आहे. हीच मोहीम जानेवारी आणि फेब्रुवारी या दोन महिन्यात राबविण्यात आली असून, यामध्ये तब्बल एक हजार ७०० पेक्षा अधिक वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या दंडात्मक कारवाईसोबतच वाहन ट्राफिक आॅफिसला जप्त करण्याची कारवाईही करण्यात आली आहे. शहरातील सर्वच प्रमुख रस्ते, यामधील नेकलेस रोड, नेहरू पार्क ते अशोक वाटिका ते अग्रसेन चौक, अकोट स्टँड ते शिवाजी महाविद्यालय, या रोडची विकास कामे सुरू असल्याने शहर वाहतूक शाखेची वाहतूक सुरळीत ठेवण्यात जास्त मनुष्यबळ खर्ची पडत आहे; मात्र तरीसुद्धा पोलीस अधीक्षक अमोघ गावकर यांच्या निर्देशानंतर वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वेळोवेळी विशेष मोहीम राबवून टपोरीगिरी व स्टंटबाजी करणारे वाहनचालक, नंबर प्लेटवर वेगळाच मजकूर लिहिणारे, कागदपत्रे जवळ न बाळगणारे, नो पार्किंगमध्ये वाहन उभे करणारे, ट्रिपल सीट तसेच धावत्या वाहनांवर मोबाइलवर बोलणाºया वाहनचालकांवर धडक कारवाई करून दोन महिन्यात जवळपास 9 हजार वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली आहे. या वाहनचालकांकडून सुमारे १२ लाख रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. अशा प्रकारची धडक मोहीम सुरूच राहणार असून, सध्या परीक्षेचे दिवस असल्याने पालकांनी अल्पवयीन मुलांना वाहने चालविण्यास देऊ नये, असे आवाहन पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी केले आहे.