पोलिसांचे मनोधैर्य वाढविण्यासाठी ‘अॅक्शन प्लॅन’!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2020 10:46 AM2020-04-19T10:46:11+5:302020-04-19T10:46:19+5:30
वरिष्ठ स्तरावरूनच ‘अॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
- सचिन राऊत
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला: कोरोना संसर्गजन्य विषाणूला रोखण्यासाठी २२ मार्चपासून ‘लॉकडाउन’ केल्यानंतर प्रत्येक जण घरात असताना या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी रात्रंदिवस रस्त्यावर असलेल्या पोलीस अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मनोधैर्य कायम राहावे, यासाठी वरिष्ठ स्तरावरूनच ‘अॅक्शन प्लॅन’ करण्यात आल्याची खात्रीलायक माहिती आहे.
रस्त्यावरील अधिकारी व कर्मचाऱ्यांना मनोबल वाढविण्यासाठी रोजच मार्गदर्शन करण्यात येते तर नागरिकांनी विनाकारण बाहेर पडू नये म्हणून त्यांनाही पोलिसांकडून भावनिक आवाहन करण्यात येत आहे. कोरोनाचे गंभीर आणि मोठे संकट आल्यानंतरही काही नागरिक विनाकारण बाहेर पडत असल्याचे वास्तव आहे. त्यामुळे अशा रिकामटेकड्यांवर कारवाई करण्यासाठी तसेच त्यांना वठणीवर आणण्यासाठी पोलीस रात्रंदिवस रस्त्यावर उभा आहे. याच कारणामुळे त्यांचा शेकडो नागरिकांशी रोज प्रत्यक्ष संपर्क येत आहे. अशातच मुंबई तसेच पुणे शहरातील काही पोलीस अधिकारी व कर्मचाºयांना कोरोनाची लागण झाल्यानंतर पोलिसांचे मनोबल कमी होण्याची शक्यता होती; मात्र प्रत्येकाच्या सुरक्षेची जबाबदारी घेतलेल्या पोलीस बांधवांनी या गंभीर संकटाच्या काळातही त्यांचे मनोबल तीळभरही कमी न होऊ देता रस्त्यावर धीरगंभीर उभा आहे. पोलीस अधिकारीही त्यांचे मनोबल वाढविण्यासाठी मार्गदर्शन करणे तसेच आवश्यक त्या सुविधा पुरविण्याचे काम करीत आहेत. काही सामाजिक संघटनांनीही पोलिसांना सॅनिटायझर, मास्क उपलब्ध करून दिले आहेत. पोलीस प्रशासनही त्यांना या सुविधा पुरवित असून, याामुळे पोलीस आजही प्रत्य्ोकाच्या सुरक्षेसाठी रस्त्यावर उभा आहे.
पोलीस ठाण्यात ‘सॅनिटायझर रूम’
पोलीस ठाण्यात तक्रार घेऊन येणाºयांसाठी तसेच प्रत्येक पोलीस कर्मचारी व अधिकारी यांच्या सुरक्षेसाठी सॅनिटायझर रूम तयार करण्यात आलेल्या आहेत. यामधून ये-जा केल्यानंतरच पोलीस ठाण्यातील अधिकारी व कर्मचारी यांचे कामकाज सुरू करण्यात येत आहे.
‘सॅनिटायझर व्हॅन’ दिवस-रात्र रस्त्यावर
शहरातील रस्त्यांवर कडेकोट बंदोबस्त देत असलेल्या पोलिसांसाठी सॅनिटायझर व्हॅन तयार करण्यात आली आहे. पोलीस विभागाची एक मोठी व्हॅन असून, यामध्ये सॅनिटायझर तसेच पोलिसांना आवश्यक असलेल्या काही बाबी ठेवण्यात आलेल्या आहेत.
अधिकाºयांचे मार्गदर्शन
पोलीस अधिकारी व कर्मचारी रोज शेकडो नागरिकांच्या संपर्कात येतात. त्यानंतर घरी जाऊन त्यांचा कुटुंबीयांसोबत संपर्क येतो; मात्र त्यांना कोरोना यापासून रोखण्यासाठी सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येत असून, ‘सोशल डिस्टन्सिंग’ही पाळण्यात येते; राष्ट्रगीत घेण्यासाठी गोळा झालेल्या पोलिसांना त्याचवेळी मार्गदर्शन करून त्यांचे मनोधैर्य वाढविण्याचा प्रयत्न पोलीस अधिकारी करतात.
पोलीस अधिकारी व कर्मचाºयांसाठी खबरदारी म्हणून आवश्यक त्या उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत; मात्र त्यानंतरही पोलिसांना अनेक अडचणींचा सामना काही टवाळखोर नागरिकांमुळे करावा लागत आहे. कुणीही विनाकारण बाहेर पडू नका, अन्यथा आता पोलिसांना त्यांची कारवाई सुरू करावी लागेल.
- सचिन कदम, शहर पोलीस उपअधीक्षक, अकोला.