सानंदांवर राजकीय सूडबुद्धीने कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 13, 2016 01:50 AM2016-02-13T01:50:54+5:302016-02-13T01:50:54+5:30
विखे पाटील यांचा भाजप सरकारवर आरोप.
बुलडाणा: काँग्रेसचे माजी आमदार दिलीपकुमार सानंदा यांच्यावर भाजपा सरकार राजकीय सूडबुद्बीने कारवाई करीत असल्याचा आरोप विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी केला. खामगाव नगरपालिका इमारत बांधकाम प्रकरणात आर्टिटेक्ट नियुक्ती प्रकरणात अपहार झाल्याचा ठपका ठेवत माजी आ. सानंदा सध्या न्यायालयीन कोठडीत असून, प्रकृती अस्वस्थतेच्या कारणावरून जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल आहेत. ना. विखे पाटील यांनी शुक्रवारी बुलडाणा जिल्हा सामान्य रुग्णालयात सानंदांची भेट घेऊन या प्रकरणात काँग्रेस पक्ष त्यांच्या पाठीशी ठामपणे उभा असल्याची ग्वाही दिली. यावेळी माजी आ. सानंदा यांनी विखे पाटील यांना सर्व प्रकरणाची माहिती देत ऑडिट ऑब्जेक्शनच्या कारणाचा हवाला देत राजकीय सूडबुद्धीने अडकविले असल्याचा आरोप केला. खामगाव नगरपालिका इमारत बांधकाम प्रकरणात आर्टिटेक्ट नियुक्ती प्रकरणात संबंधित आर्किटेक्टला १ लाख ५६ हजारांची फी जास्तीची देण्यात आली आहे. ही बाब लेखा परीक्षणात समोर आल्याने त्याचा आधार घेत अपहार झाल्याचा बागुलबुवा विरोधकांनी उभा केला असल्याचे माजी आ. सानंदा यांनी ना. विखे यांना सांगितले. या भेटीनंतर विखे पाटील यांनी विङ्म्रामगृहावर पत्रकारांशी बोलताना सानंदा हे तीन वेळा आमदार होते. त्यांनी चांगले काम केले. आता ते आमदार नसले तरी संपूर्ण काँग्रेस त्यांच्या पाठीशी आहे. भाजपा सरकारने पोलीस बळाचा वापर करीत त्यांना अडकविले असून, त्यांच्यावर राजकीय सूड उगवित आहे. सरकारच्या राजकीय दबावात सर्व यंत्रणा काम करीत असल्याचा खळबळजनक आरोप विखे पाटील यांनी पत्रकारांशी बोलताना केला. विशेष म्हणजे माजी आ. सानंदा यांच्या संदर्भात १७ फेब्रुवारी रोजी प्रदेशाध्यक्षांच्या सोबत बैठकीचे आयोजन करण्यात आले असून, यावेळी काँग्रेसचे सर्व नेते हजर राहणार आहेत. हा विषय न्यायप्रविष्ट असल्यामुळे या संदर्भात अधिक बोलणार नाही; पण काँग्रेस आमदार सानंदा यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे, अशी ग्वाही ना. विखे यांनी दिली. यावेळी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष विजय अंभोरे, आमदार राहुल बोंद्रे, आमदार हर्षवर्धन सपकाळ उपस्थित होते.