विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी कृती कार्यक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 23, 2018 12:06 AM2018-01-23T00:06:16+5:302018-01-23T00:07:48+5:30
अकोला : राज्यातील प्रत्येक जिल्हय़ात प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमाची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत असून, या वर्षीच्या संकलित चाचणी २ मध्ये सर्व प्राथमिक शाळांतील शंभर टक्के विद्यार्थी प्रगत झाले पाहिजेत. या दृष्टिकोनातून प्रयत्न करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर ठरविण्यासाठी शिक्षण विभागामार्फत कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क

जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च प्राथमिक शाळेतील सर्व विद्यार्थ्यांचा भाषा व गणित विषयातील अध्ययन स्तर १९ ते २५ जानेवारी या कालावधीत निश्चित करून गटशिक्षणाधिकार्यांनी त्यासाठी नियोजन करावे. यासोबतच तालुक्यातील सर्व शाळांतील विद्यार्थ्यांचा अध्ययन स्तर गटशिक्षणाधिकारी शिक्षण विस्तार अधिकारी, केंद्र प्रमुख, विषय साधन व्यक्ती यांनी निश्चित करतील. तसेच जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेचे प्राचार्य, वरिष्ठ अधिव्याख्याता, अधिव्याख्याता, माध्यमिक व प्राथमिक शिक्षणाधिकारी, उपशिक्षणाधिकारी हे सुद्धा प्रत्येकी एका शाळेतील विद्यार्थ्यांच्या भाषा व गणित विषयाचा अध्ययन स्तर निश्चित करतील. त्याची माहिती दिलेल्या संकेतस्थळावर त्याच दिवशी भरतील. स्तर निश्चितीची माहिती संबंधित वर्ग शिक्षकास देऊन माहिती शाळेच्या शेरेबुकात नोंद करावी. वर्गातील अप्रगत विद्यार्थ्यांचा अप्रगत विषयांसाठी (भाषा व गणित) कृती कार्यक्रम वर्गशिक्षक, विषय शिक्षकांनी तयार कारावा. यासह इतरही कृती कार्यक्रम ठरविण्यात आले आहे.
शाळांमध्ये पायाभूत चाचणी, संकलित परीक्षा १ घेण्यात आली. यात विद्यार्थ्यांना मिळालेल्या गुणांच्या आधारे शिक्षकांनी अध्ययन स्तर निश्चित करावा आणि त्यानंतर कृती कार्यक्रमाचे नियोजन करावे. आम्ही प्रत्येक शाळेतील एक शिक्षक प्रशिक्षित केलेला आहे.
- डॉ. प्रकाश जाधव
प्राचार्य, जिल्हा शैक्षणिक सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था