गुणाकार, भागाकारात अडचणी येणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2019 02:32 PM2019-04-10T14:32:23+5:302019-04-10T14:32:28+5:30
जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
अकोला: अनेक विद्यार्थ्यांना गणित विषय कठीण, क्लिष्ट वाटतो. त्यामुळे विद्यार्थी बऱ्याचदा गणित विषयापासून दूर पळतात. विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार करताना अडचणी येतात. नव्हे, तर अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमतच नाही. यातून मार्ग काढण्यासाठी गतवर्षीप्रमाणेच यंदासुद्धा जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्थेने पुढाकार घेतला असून, विद्यार्थ्यांसाठी येत्या शैक्षणिक वर्षामध्ये सलग दुसऱ्यांदा कृती कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
जिल्ह्यातील स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमधील इयत्ता सातवीत शिकणाºया प्रत्येक तालुक्यातील १0 शाळांमधील १00 याप्रमाणे ७00 विद्यार्थ्यांची गुणाकार व भागाकाराची पूर्व चाचणी व उत्तर चाचणी घेण्यात आली. या दोन्ही चाचणीतून शिक्षक व शिक्षण तज्ज्ञांनी काढलेल्या निष्कर्षानुसार विद्यार्थ्यांसाठी कृती कार्यक्रम तयार केला होता. प्रायोगिक तत्त्वावर दोन महिने हा कृती कार्यक्रम राबविल्यानंतर पूर्व व उत्तर चाचणीमध्ये गुणाकार व भागाकाराची क्रिया करण्यामध्ये १0 ते १२ टक्के विद्यार्थ्यांमध्ये फरक दिसून आल्याचे जाणवले. तो सरत्या शैक्षणिक वर्षामध्ये राबविण्यात आला. या कृती कार्यक्रमादरम्यान विद्यार्थ्यांमध्ये कितपत बदल घडला, हे दिसून आले. त्यामुळे नुकत्याच झालेल्या गुणवत्ता कक्षाच्या बैठकीत कृती कार्यक्रमाविषयी चर्चा करण्यात आली. स्थानिक स्वराज्य संस्थेच्या शाळांमध्ये शिकणाºया अनेक विद्यार्थ्यांना गुणाकार व भागाकार जमत नाही. गणित विषय बौद्धिक क्षमतेच्या पलीकडे जात असल्याने या विद्यार्थ्यांमध्ये गणित विषयाची आवड निर्माण झाली पाहिजे. यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे. त्या दृष्टिकोनातून जिल्ह्यातील सातही तालुक्यांतील शाळांची निवड करून विद्यार्थ्यांसाठी दुसºया वर्षीही कृती कार्यक्रम तयार करण्यात येणार आहे. सध्या माध्यमिक शाळांच्या परीक्षा सुरू आहेत तर काही शाळांच्या परीक्षा आटोपल्या आहेत. उन्हाळी सुटी संपल्यानंतर शैक्षणिक सत्राच्या पहिल्या टप्प्यात या शाळांमध्ये कृती कार्यक्रमानुसार विद्यार्थ्यांना गणित विषय समजेल आणि त्यांच्यामधील गुणाकार व भागाकाराची भीती दूर होईल. यासाठी प्रयत्न करण्यात येणार आहेत. (प्रतिनधी)
गुणाकार व भागाकाराचे संबोध घेतले आणि विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभूती व गणितपेटी साहित्यावर आधारित शिकविले, सराव दिला तर गणित समजणे सोपे जाते. प्रायोगिक तत्त्वावर राबविलेल्या कृती कार्यक्रमानंतर विद्यार्थ्यांचा पूर्ण कल अद्याप यायचा आहे. तो कळल्यावर येत्या शैक्षणिक वर्षातही गुणाकार व भागाकारासाठी कृती कार्यक्रम राबवू.
-डॉ. प्रकाश जाधव, प्राचार्य.
जिल्हा शैक्षणिक व सातत्यपूर्ण व्यावसायिक विकास संस्था.