जीवनावश्यक दुकाने वगळता इतर दुकानांवर कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 7, 2021 04:19 AM2021-04-07T04:19:05+5:302021-04-07T04:19:05+5:30
पोलीस अधीक्षक श्रीधर यांचा इशारा मंगळवारी दिवसभर करण्यात आली कारवाई अकोला : राज्य शासनाने व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरासह जिल्ह्यात ...
पोलीस अधीक्षक श्रीधर यांचा इशारा
मंगळवारी दिवसभर करण्यात आली कारवाई
अकोला : राज्य शासनाने व त्यानंतर जिल्हाधिकाऱ्यांनी शहरासह जिल्ह्यात ५ ते ३० एप्रिल या कालावधीत निर्बंध लागू केले असून केवळ जीवनावश्यक वस्तूंची दुकाने सुरू ठेवण्यास सांगितले आहे. मात्र, त्यानंतरही इतर दुकाने सुरू असल्याने मंगळवारी दिवसभर अकोला पोलिसांकडून कारवाई करण्यात आली. त्यानंतरही जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता इतर दुकाने सुरू असल्यास त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांनी दिला आहे.
सिव्हील लाईन पोलीस ठाण्याच्या हद्दीतील कापड, मोबाईल तसेच इतर काही दुकाने सुरू असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. या माहितीवरून सिव्हील लाईन्स पोलिसांनी तातडीने आरएलटी कॉलेजसमोरील परिसरात धाव घेऊन या दुकानदारांच्या दुचाकी जप्त केल्या. त्यानंतर शहरातील प्रत्येक भागांत गस्त वाढविण्यात आली असून जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसारच दुकाने सुरू ठेवण्यात येणार आहेत. याव्यतिरिक्त कोणतेही दुकाने सुरू राहिल्यास त्यांच्यावर पोलिसांकडून कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा देण्यात आला आहे. त्यानुसार शहरात पथकांचे गठन करण्यात आले असून पोलिसांची गस्त पहाटेपासून रात्री उशिरापर्यंत सुरू राहणार आहे. यादरम्यान जीवनावश्यक वस्तूंची दुकानेवगळता इतर दुकाने सुरू असल्यास त्यांना दंडात्मक तसेच फौजदारी कारवाईला सामोरे जावे लागणार असल्याचा इशाराही पोलीस अधीक्षकांनी दिला आहे. त्यामुळे राज्य सरकारने व जिल्हाधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशाचे काटेकोर पालन करून कोरोना रोखण्यासाठी सर्वांनी सहकार्य करण्याचे आवाहन पोलीस अधीक्षक श्रीधर यांनी केले आहे. शहरातील नागरिक किंवा व्यापारी या नियमांचे पालन करणार नाही त्यांच्यावर बुधवारपासून कठोर कारवाई करण्यात येणार आहे.