भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास टाळाटाळ केल्यास कारवाई!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 19, 2018 04:16 PM2018-06-19T16:16:31+5:302018-06-19T16:16:31+5:30
भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना (एलडीएम) दिला.
अकोला : जिल्ह्यात पीक कर्ज वाटपात वर्ग -२ ची जमीन असलेल्या भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपास बँकांकडून टाळाटाळ करण्यात करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुुळे भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपात टाळाटाळ करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी जिल्हा अग्रणी बँक व्यवस्थापकांना (एलडीएम) दिला.
जिल्ह्यात सध्या खरीप हंगामासाठी शेतकऱ्यांना पीक कर्ज वाटपाचे काम सुरू आहे; परंतु, ज्या शेतकऱ्यांची जमीन वर्ग -२ ची आहे, अशा भोगवटादार शेतकऱ्यांना पीक कर्ज देण्यास बँकांकडून टाळाटाळ करण्यात येत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्यानुषंगाने ८ एप्रिल १९८३ रोजीच्या शासन निर्णयानुसार शासकीय योजनांचा सर्व शेतकऱ्यांना लाभ मिळावा, यासाठी ज्या शेतकºयांची जमीन वर्ग-२ ची आहे, अशा भोगवटादार शेतकºयांना पीक कर्ज वाटपाचा लाभ देण्यात यावा, या कामात कोणत्याही प्रकारची दिरंगाई अथवा टाळाटाळ करण्यात येऊ नये, अन्यथा कारवाई करण्यात येणार आहे, असा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना दिला आहे. यासंदर्भात जिल्हा अग्रणी बँक अधिनस्त जिल्ह्यातील बँकांना आदेशित करण्याचे निर्देशही जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्हा अग्रणी बँकेच्या व्यवस्थापकांना आदेशात दिले आहेत.