बेशिस्त वाहनांवर कारवाईचा धडाका
By admin | Published: September 17, 2014 02:39 AM2014-09-17T02:39:21+5:302014-09-17T02:39:21+5:30
अकोला येथे टोइंग पथकाकडून १९ वाहनांवर कारवाई.
अकोला : शहरातील बेताल वाहतुकीने कळस गाठला असून, ही वाहतूक सुरळीत करण्यासाठी मंगळवारी वाहतूक शाखेच्या टोइंग पथकाकडून महत्त्वाच्या मार्गावरील अस्ताव्यस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई करण्यात आली. त्यांच्याकडून २ हजार २00 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. शहरातील बेताल वाहतुकीचे सचित्र वृत्त लोकमतने प्रकाशित केल्यानंतर वाहतूक शाखेकडून ही कारवाई करण्यास प्रारंभ करण्यात आला.
शहरातील वाहतूक व्यवस्था सुरळीत व्हावी, यासाठी जिल्हा पोलिस अधीक्षकांनी वाहतूक शा खेच्या माध्यमातून टोइंग पथक सुरू केले आहे. शहरातील अत्यंत रहदारीच्या असलेल्या मार्गावर वाहतुकीला मोठय़ा प्रमाणात अडथळा निर्माण होत असून, याला ही वाहने जबाबदार असल्याचे दिसून आले. त्यामुळे अशा प्रकारच्या वाहनांवर मंगळवारी या पथकाकडून कारवाई करण्यात आली. सिव्हिल लाईन्स मार्गावर रस्त्यापासून बर्याच अंतरावरील वाहने या पोलिसांनी जप्त केल्याने वादाचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे नियमावली ठरविण्यात यावी आणि त्यानंतरच रस्त्यावरील वाहनांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली.
मंगळवारी या पथकाने बेशिस्त असलेल्या १९ वाहनांवर कारवाई केली आहे. यामध्ये १६ वाहनांवर दंडात्मक कारवाई करण्यात आली असून, ३ वाहनांवर जप्तीची कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईमुळे दोन ते तीन मार्गावरील वाहतूक सुरळीत असल्याचे दिसून आले.