पाणी पाउचच्या कारखान्यावर मनपासह प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2018 01:02 PM2018-09-12T13:02:40+5:302018-09-12T13:03:20+5:30
पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली.
अकोला : शासनाच्या प्लास्टिक बंदीचे सर्व निकष, नियम पायदळी तुडवित पश्चिम झोन अंतर्गत येणाऱ्या जाजू नगरमध्ये एका व्यावसायिकाने सुरू ठेवलेल्या पाणी पाउचच्या कारखान्यावर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांच्यासह प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे यांनी धाड घातली. या प्रकरणात मनपा प्रशासनाने विशाल केसवाणी नामक व्यावसायिकाला पाच हजार रुपयांचा दंड ठोठावला असून, प्रदूषण नियंत्रण मंडळाने हा कारखाना बंद करण्याचे संकेत दिले आहेत.
प्लास्टिकच्या विविध वस्तू, पिशव्यांसह थर्माकॉलच्या वापरामुळे पर्यावरणाची हानी होत असल्यामुळे राज्य शासनाने प्लास्टिक बंदीचा निर्णय घेतला आहे. मनपा प्रशासनाच्यावतीने सातत्याने शहरात प्लास्टिक पिशव्यांचा साठा करणाºया तसेच विक्री करणाºया व्यावसायिकांच्या प्रतिष्ठानांवर धाड घालून साहित्य जप्त करण्याची कारवाई केली जात आहे. पश्चिम झोनमधील अन्नपूर्णा माता मंदिरासमोरील जाजू नगरमध्ये एका राहत्या घरात पाणी पाउच तयार करण्याचा कारखाना सुरू असल्याची माहिती आरोग्य निरीक्षक सूरज खेडकर, सोहम कुळकर्णी, प्रशिष भातकुले, कुणाल भातकुले यांना मिळाली होती. आरोग्य निरीक्षकांनी याची खातरजमा केल्यानंतर मंगळवारी महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ, प्रदूषण नियंत्रण मंडळाचे पर्यावरण अधिकारी जितेंद्र पुराटे, नगरसचिव अनिल बिडवे, दक्षिण झोनच्या क्षेत्रीय अधिकारी पूनम कळंबे, उत्तर झोनचे क्षेत्रीय अधिकारी वासुदेव वाघाडकर, आरोग्य विभाग अधीक्षक प्रशांत राजूरकर, मुख्य आरोग्य निरीक्षक संजय खोसे यांनी धाड घातली.
दोन ट्रॅक्टर पाउचचा साठा जप्त!
विशाल केसवाणी यांच्या कारखान्यातून मनपाने दोन ट्रॅक्टर भरून असलेला पाउच साठा तसेच इतर साहित्य जप्त करण्याची कारवाई केली. पूर्व झोनमधील खोलेश्वर भागात अर्जुन अॅक्वाची तपासणी केली असता पाणी पाउचचे ५० कट्टे आढळून आले. या प्रकरणात संबंधित व्यावसायिकाला पाच हजार रुपये दंड आकारण्यात आला.