वाहतुकीला अडथळा करणाऱ्या ४० ऑटोंवर कारवाईचा बडगा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 8, 2020 04:16 AM2020-12-08T04:16:33+5:302020-12-08T04:16:33+5:30
अकोला: शहरात प्रमुख रस्त्यावर व बाजारपेठेमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ४० ऑटोचालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर ...
अकोला: शहरात प्रमुख रस्त्यावर व बाजारपेठेमध्ये वाहतुकीला अडथळा ठरणाऱ्या ४० ऑटोचालकांवर शहर वाहतूक शाखेने कारवाईचा बडगा उगारला आहे. शहर वाहतूक शाखेने केलेल्या कारवाईत एकाच दिवशी ५८ हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे. ही विशेष मोहीम एक महिना सुरू राहणार आहे.
शहरात जवळपास सर्व प्रमुख मार्गावर रस्त्यांची विकास कामे सुरू असल्याने वाहतूक नियंत्रित करताना वाहतूक कर्मचाऱ्यांची धावपळ होते. त्यात शहराच्या क्षमतेच्या अधिक ऑटो धावत असून, वेळोवेळी वाहतुकीचा खोळंबा होतो. यासाठी शहर वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके यांनी वेळोवेळी ऑटोचालकांची स्ट्रीट मीटिंग घेऊन त्यांना मार्गदर्शन केले; परंतु ऑटोचालकांमध्ये सुधारणा दिसून न आल्यामुळे आजपासून त्यांच्याविरुद्ध कारवाईचा बडगा उगरण्यात आला आहे. वाहतूक पोलीस निरीक्षक गजानन शेळके, पोलीस उपनिरीक्षक सुरेश वाघ यांनी कागदपत्रे जवळ न बाळगणारे व दंड न भरणारे ऑटो वाहतूक कार्यालयात लावण्याची कारवाई सुरू करून एकाच दिवसात ४० ऑटो वाहतूक कार्यालयात लावले आहेत. त्यांच्याकडून प्रलंबित दंड भरून घेऊन व कागदपत्रे दाखविल्यानंतरच त्यांना सोडण्यात आले.
--- एकाच दिवशी ५८ हजारांचा दंड वसूल
या कारवाईत ऑटो चालकांकडून ५८ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. ही मोहीम संपूर्ण महिनाभर सुरूच राहणार असून, ऑटोचालकांनी त्यांच्याकडे प्रलंबित असलेला दंड भरावा तसेच वाहतूक नियमांचे पालन करून वाहतुकीस अडथळा निर्माण होणार नाही याबाबत दक्षता घेणे गरजेचे आहे.
--- कोट--
शहरात अधिक क्षमतेपेक्षा ऑटो धावत असल्यामुळे वाहतुकीला अडथळा निर्माण होत आहे. अशा वाहनांवर कारवाई करण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येत आहे. गजानन शेळके, पोलीस निरीक्षक, शहर वाहतूक शाखा