मुरुमाचे अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकांवर होणार कारवाई
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:28 AM2021-02-23T04:28:34+5:302021-02-23T04:28:34+5:30
खेट्री: पातूर तालुक्यातील चतारी येथे शासकीय जागेतून गेल्या वीस दिवसांमध्ये १२० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून सात ते आठ ट्रॅक्टरद्वारे ...
खेट्री: पातूर तालुक्यातील चतारी येथे शासकीय जागेतून गेल्या वीस दिवसांमध्ये १२० ब्रास मुरूमाचे उत्खनन करून सात ते आठ ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक करण्यात आल्याचे उघड झाले आहे. याबाबतचे वृत्त ‘लोकमत’ने २१ फेब्रुवारी रोजीच्या अंकात प्रकाशित करतात संबंधित महसूल विभाग खडबडून जागा झाला असून, मुरूमाचे उत्खनन करून अवैध वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर मालकावर कारवाई करणार असल्याची माहिती तहसीलदार यांनी दिली आहे. तसेच जेसीबी मशीनद्वारे मुरूमाचे उत्खनन करून सांगोळा-चतारी मार्गाच्या कामात वापरण्यात आल्याने रस्त्याच्या कामाची सुद्धा चौकशी करण्यात येणार आहे.
पातूर तालुक्यातील चतारी येथे शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन महिनाभरापासून सुरू आहे. दि. २८ जानेवारी व १९ फेब्रुवारी या दोन वेगवेगळ्या दिवशी मंडळ अधिकारी, व तलाठ्याने शासकीय जागेचा पंचनामा केला असता १२० ब्रास मुरूमाचे जेसीबी मशीनद्वारे उत्खनन करून अवैध वाहतूक करण्यात आल्याचे उघडकीस झाले आहे. उत्खननामुळे शासनाला लाखो रुपयांचा चुना लागत असल्याचे समोर आले आहे.
---------------------
रात्रंदिवस मुरुमाचे अवैध उत्खनन
महसूल विभागाचा वचक संपल्याने चतारी येथे शासकीय जागेतून जेसीबी मशीनद्वारे मुरुमाचे उत्खनन रात्रंदिवस सुरू असते, शेकडो ब्रास मुरुमाचे उत्खनन करून वाहतूक करण्यात आली आहे. त्यामुळे लाखो रुपयांचा महसूल बुडाला आहे.
---------------------
शासकीय जागेतून उत्खनन करून ज्या ट्रॅक्टरद्वारे अवैध वाहतूक केली आहे. त्या ट्रॅक्टर मालकाला नोटीस बजावून कारवाई करण्यात येईल, तसेच त्या भागातील रस्त्यांच्या कामांमध्ये जर मुरूमाचा वापर झाला असेल तर त्या रस्त्याची सुद्धा चौकशी करू.
दीपक बाजड, तहसीलदार.