अकोला : सूचना न देता कारवाई; युवक काँग्रेसची महावितरण कार्यालयावर धडक
By रवी दामोदर | Published: March 13, 2024 04:27 PM2024-03-13T16:27:26+5:302024-03-13T16:27:40+5:30
गेल्या आठ दिवसांमध्ये महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली नागरिकांना सूचना न देता कारवाई करण्यात येत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत.
अकोला : गेल्या आठ दिवसांमध्ये महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावाखाली नागरिकांना सूचना न देता कारवाई करण्यात येत असल्याने शहरवासी त्रस्त झाले आहेत. याविरोधात युवक काँगेस कमिटीच्यावतीने बुधवार, दि. १३ मार्च रोजी महावितरण कार्यालयावर धडक देत ही कारवाई थांबविण्यात यावी, अशी मागणी करण्यात आली आहे.
महावितरणतर्फे ‘मार्च एण्डिंग’च्या नावावर कुठलीही पूर्व सूचना व नोटीस न देता अन्यायकारक पद्धतीने कारवाई होत असल्याचा आरोप युवक कॉंग्रेसच्यावतीने करण्यात आला आहे. कोणतीही पूर्वसूचना, नोटीस न देता वीज पुरवठा खंडित करणे, मीटर काढून नेणे यासारखे प्रकार वाढले आहे. यासोबत उन्हाळ्याचे दिवस असल्याने विजे अभावी सामान्य नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. याविरुद्ध युवक काँग्रेसने जिल्हाध्यक्ष आकाश कवडे यांच्या नेतृत्वात महावितरण कार्यालयात धडक देण्यात आली.
यावेळी संबंधित अधिकाऱ्यांना जाब विचारण्यात आला असून, अधिकाऱ्यांनी असे प्रकारच्या कारवाई टाळण्याचे आश्वासन दिले. यानंतरही कारवाई सुरू राहिल्यास युवक काँगेसच्यावतीने तीव्र आंदोलन करण्यात येईल, असा इशाराही युवक कॉंग्रेसच्यावतीने देण्यात आला आहे. यावेळी युवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष राहुल सारवान, अंकुश पाटील तायडे, विद्यार्थी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अभिजित तवर, युवा काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मो. शारिक, संतोष झांझोटे,संतोष निधाने, सोहम गवई आदी पदाधिकारी उपस्थित होते.