तूर खरेदीत २० कोटींच्या भ्रष्टाचारानंतरही कारवाईला बगल
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2018 01:50 PM2018-12-03T13:50:24+5:302018-12-03T13:50:42+5:30
अकोला: नाफेडने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात २० कोटी ३९ लाखांचा भ्रष्टाचार करणाऱ्या व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघाने संगनमत केल्याचे ३ जुलै रोजीच्या चौकशी अहवालात उघड झाले.
अकोला: नाफेडने सुरू केलेल्या तूर खरेदी केंद्रात २० कोटी ३९ लाखांचा भ्रष्टाचार करणाऱ्या व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती, तालुका खरेदी-विक्री संघाने संगनमत केल्याचे ३ जुलै रोजीच्या चौकशी अहवालात उघड झाले. फौजदारी प्रक्रियेत असताना विभागीय सहनिबंधकांनी चौकशीला स्थगिती दिल्यानंतर अद्यापही पुढील कारवाई न झाल्याने याप्रकरणी पाणी मुरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे. विशेष म्हणजे, अशाच प्रकरणात बार्शीटाकळी खरेदी-विक्री संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १४ नोव्हेंबर रोजी दिला होता.
आधारभूत दराने तूर खरेदी करण्यासाठी नाफेडने २०१७ मध्ये अकोट सहकारी खरेदी-विक्री संघाला काम दिले. या प्रक्रियेतून खरेदी-विक्री संघाने माघार घेतल्यानंतर कृषी उत्पन्न बाजार समिती अकोट व ‘व्हीसीएमएफ’ यांना खरेदी केंद्रातील काम देण्यात आले. अकोट केंद्रातील तूर खरेदीत भ्रष्टाचार झाल्याची तक्रार कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती गजानन पुंडकर यांनी केली होती. त्यावर सहकार मंत्री सुभाष देशमुख यांनी अकोला जिल्हाधिकारी यांना चौकशी करण्याचा आदेश दिला होता. जिल्हाधिकाºयांच्या आदेशाने जिल्हा उपनिबंधकांनी अकोटचे सहायक निबंधक शेकोकार यांच्या पथकाकडे चौकशी दिली. चौकशीचा अहवाल ३ जुलै २०१८ रोजी देण्यात आला. त्यामध्ये अडीच महिन्यांच्या कालावधीत २० कोटी ३९ लाख रुपयांच्या तूर खरेदीत व्हीसीएमएफ, कृषी उत्पन्न बाजार समिती व तालुका खरेदी-विक्री यांनी संगनमताने भ्रष्टाचार केल्याचे पुढे आले. त्यावरून अकोट पोलीस ठाण्यात तक्रारही देण्यात आली; मात्र तत्कालीन ठाणेदारांनी उपविभागीय पोलीस अधिकाºयांचे मार्गदर्शन मागविले. त्याच काळात चौकशी अहवालाला विभागीय सहनिबंधकांकडे आव्हान देण्यात आले. सहनिबंधकांनी चौकशी अहवालाला स्थगनादेश दिला. जुलैपासून त्या स्थगनादेशानंतर पुढे कुठलीच कारवाई प्रशासनाकडून झालेली नाही. तूर खरेदीत आठ कोटींपर्यंत रकमेचा भ्रष्टाचार निश्चितच झाल्याचे पुढे येत आहे; मात्र कारवाई होत नसल्याने या प्रकरणात पाणी मुरत असल्याची शंका व्यक्त होत आहे.
बार्शीटाकळीत कारवाई; अकोटला सूट
मुख्यमंत्री फडणवीस यांनी बार्शीटाकळी खविसं बरखास्त करून संचालकांवर गुन्हे दाखल करण्याचा आदेश दिला. त्याचवेळी अकोट खविसं, कृषी उत्पन्न बाजार समिती, ‘व्हीसीएमएफ’ने केलेल्या भ्रष्टाचाराबाबत काहीही केले नाही. ही कारवाई तातडीने करावी, अशी मागणी पुंडकर यांनी केली आहे.