राज्यात माध्यमिकचे ६४५ शिक्षक ठरले अतिरिक्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 5, 2018 12:20 PM2018-12-05T12:20:05+5:302018-12-05T12:21:52+5:30
२0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत.
अकोला: गत तीन-चार महिन्यांपासून राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील अतिरिक्त शिक्षकांची माहिती, आरक्षण, विषय आणि वर्गांची माहिती संकलित करण्याचे काम सुरू होते. २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यामध्ये माध्यमिक शाळांमधील ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत. या सर्व शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया प्रत्येक जिल्ह्यात राबविण्यात येत आहेत. राज्यात काही जिल्ह्यांमध्ये समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे, तर काही जिल्ह्यांमध्ये ही प्रक्रिया आटोपली आहे.
शिक्षण विभागाने शासनाच्या समायोजन पोर्टलवर माध्यमिक शाळांना अतिरिक्त शिक्षकांच्या माहितीसह, रिक्त पदे, आरक्षण, विषयांची माहिती टाकण्यास सांगितले होते. त्यानुसार राज्यातील माध्यमिक शाळांनी ही माहिती समायोजन पोर्टल भरली. २0१७-१८ च्या संचमान्यतेनुसार राज्यातील सर्वच जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त ठरलेल्या शिक्षकांची पडताळणी शिक्षण विभागाकडून करण्यात आली. माध्यमिक शाळांमधील एकूण ६४५ शिक्षक अतिरिक्त ठरले आहेत, तर १,२0६ पदे रिक्त आहेत. अतिरिक्त शिक्षकांच्या समायोजनाची प्रक्रिया सुरू आहेत. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या कमी आहे. त्या ठिकाणी रिक्त जागांवर शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. ज्या जिल्ह्यांमध्ये अतिरिक्त शिक्षकांची संख्या ५0 च्यावर आहे. त्या जिल्ह्यात समायोजनाची प्रक्रिया सुरू आहे. अकोला जिल्ह्यातील समायोजनाची प्रक्रिया मंगळवारी आटोपली असून, एकूण ६३ शिक्षकांचे समायोजन करण्यात आले. काही जिल्ह्यांमध्ये संचमान्यतेची पडताळणी करताना, वाढीव पदे आढळून आली आहेत. विशेष म्हणजे, अतिरिक्त शिक्षकांचे ‘आॅन दी स्पॉट’ समायोजन करण्यात येत आहे. (प्रतिनिधी)