अकोला जिल्हा वार्षिक योजनेसाठी मिळणार अतिरिक्त निधी
By admin | Published: January 29, 2015 01:18 AM2015-01-29T01:18:42+5:302015-01-29T01:18:42+5:30
लोकप्रतिनिधी आज वित्तमंत्र्यांकडे करणार मागणी.
संतोष येलकर / अकोला: जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी ९३ कोटी ६७ लाखांच्या तरतुदीस जिल्हा नियोजन समितीच्या (डीपीसी) सभेत मंजुरी देण्यात आली आहे. तथापि जिल्ह्यासाठी आवश्यक असलेल्या १४५ कोटी ६२ लाखांच्या अतिरिक्त निधीची मागणी गुरुवारी अमरावती येथे विभागीय बैठकीत जिल्ह्यातील लोकप्रतिनिधींकडून राज्याच्या वित्तमंत्र्यांकडे करण्यात येणार आहे. त्यामुळे जिल्हा वार्षिक योजनेसाठी अतिरिक्त निधी मिळणार असल्याचे संकेत प्राप्त झाले आहेत. गत शनिवारी पार पडलेल्या जिल्हा नियोजन समितीच्या सभेत सन २0१५-१६ या वर्षासाठी जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेंतर्गत कृषी व संलग्न सेवा, ग्राम विकास, सामाजिक व सामूहिक सेवा, पाटबंधारे आणि पूरनियंत्रण, ऊर्जा, उद्योग व खाण, परिवहन, सामान्य आर्थिक सेवा, सामान्य सेवा आणि नावीण्यापूर्ण, बळकटीकरण व मूल्यमापन या क्षेत्रांसाठी ९३ कोटी ६७ लाखांच्या प्रारुप आराखड्यास मंजुरी देण्यात आली. जिल्हा वार्षिक सर्वसाधारण योजनेसाठी मंजूर आराखड्यात तरतुदीच्या व्यतिरिक्त १४५ कोटी ६२ लाख ४७ हजार रुपयांची अतिरिक्त मागणी करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत अमरावती विभागातील पाचही जिल्ह्यांची बैठक गुरुवार, २९ जानेवारी रोजी अमरावती येथील विभागीय आयुक्त कार्यालयात राज्याचे वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार घेणार आहेत. या बैठकीला अकोला जिल्ह्याचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्यासह जिल्ह्यातील लोकप्रतिनिधी आणि जिल्हाधिकारी व संबंधित अधिकारी उपस्थित राहणार आहेत.