अडगाव ‘बंद’ प्रकरणी पन्नास जणांविरुद्ध गुन्हा दाखल
By admin | Published: February 4, 2017 02:39 AM2017-02-04T02:39:34+5:302017-02-04T02:39:34+5:30
सहा आरोपींना अटक; पोलीस बंदोबस्तात वाढ
हिवरखेड (अकोला), दि. 0३- फेसबुकवर आक्षेपार्ह फोटो टाकल्याच्या निषेधार्थ अडगाव बु. येथे काही युवकांनी हातात काठय़ा, तलवारी घेऊन गाव बंद करण्याचा प्रयत्न केला होता. याप्रकरणी हिवरखेड पोलिसांनी २ फेब्रुवारी रोजी रात्री अडगाव बु. येथील ५0 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, सहा जणांना अटक केली आहे.
अडगाव बु. येथील शुभम ठाकूर या युवकाने १ फेब्रुवारी बुधवार रोजी अल्पसंख्याक समाजाच्या धार्मिक भावना दुखावणारे छायाचित्र, मजकूर फेसबुक टाकल्यामुळे अडगाव येथे तणाव निर्माण झाला होता. ठाणेदार प्रेमानंद कात्रे यांनी सदर युवकाविरुद्ध भादंवि २९५ कलमान्वये गुन्हा दाखल करून त्याला तत्काळ अटकसुद्धा केली. सध्या ठाकूर हा पोलीस कोठडीत आहे.
या घटनेचा निषेध नोंदविण्यासाठी अडगाव बु. येथील काही युवकांनी बेकायदेशीर जमाव जमवून हातात लाठय़ा-काठय़ा, लोखंडी पाइप घेऊन जबरीने अडगाव ह्यगाव बंदह्ण करण्याचा प्रयत्न केला होता, तसेच इतर ग्रामस्थांना शिवीगाळ, दगडफेक केली होती. याप्रकरणी हवालदार राजेश भगत यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी अडगाव बु. येथील ५0 जणांवर भादंवि १४३, १४५, १४७, १४८, ५0५ सह महाराष्ट्र पोलीस अधिनियम १३५ कलमान्वये गुरुवारच्या रात्री गुन्हे दाखल केले, तसेच यातील वसीम खा सलीम खा, मो. इरफान मो. अजीज, शे. आसीफ शे. खालीक, अनवर खा रसीद खा, आबिदअली जाफरअली व शे. यासीन शे. हुसेन या सहा जणांना अटक केली. दरम्यान, अडगाव बु. येथे जिल्हा पोलीस अधीक्षक चंद्रकिशोर मीणा, अपर पोलीस अधीक्षक विजयकांत सागर, एसडीपीओ राजेंद्र मनवरे यांनी भेटी देऊन ग्रामस्थांना शांतता राखण्याचे आवाहन केले. अडगावात तणावपूर्ण शांतता असून, जादा पोलीस कुमक तैनात आहे. ठाणेदार कात्रे, उपनिरीक्षक शरद भस्मे, गोपाल दातीर, योगेश राठोड, महादेव शेंडे, सुनील धार्मिक आदी पोलीस पथक तळ ठोकून आहे.