टायपिंगच्या विश्वविक्रमात नोंदीसाठी आदित्यचा प्रयत्न!
By admin | Published: June 30, 2017 01:28 AM2017-06-30T01:28:53+5:302017-06-30T01:28:53+5:30
अकोला : आदित्य सुरेश गावंडे याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांचा उच्चांक मोडून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : लहान उमरी परिसरात राहणारा आदित्य सुरेश गावंडे याने वयाच्या अवघ्या १७ व्या वर्षीच कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांचा उच्चांक मोडून अकोल्याच्या शिरपेचात मानाचा तुरा खोवला आहे. या विश्वविक्रमाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होण्यासाठी आदित्य प्रयत्न करीत आहे.
गुरुवारी स्थानिक हॉटेलमध्ये बोलाविण्यात आलेल्या पत्रकार-परिषदेत आदित्यने आपल्या आगळ््या वेगळ््या विश्वविक्रमाची माहिती दिली. यावेळी सेफ हॅण्डचे प्रा. नितीन ओक, आदित्यचे वडील सुरेश गावंडे उपस्थित होते.
आदित्यने सांगितले, की इयत्ता आठवीमध्ये असताना टायपिंग करण्याची गोडी लागली. आज जवळपास पाच वर्षांपासून टायपिंग स्पीड कसा जास्तीत जास्त होईल, यासाठी प्रयत्न करीत आहे. एकदा इंटरनेटवर सहज सर्फिंग करीत असताना टायपिंगची माहिती जाणून घेण्याची उत्कंठा लागली.
यावेळी गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डची वेबसाईट त्यामध्ये काय आहे, हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला. सहज म्हणून त्यामध्ये कॉम्प्युटर टायपिंगमध्ये हैदराबाद येथील खुर्शीद हुसेन यांच्या नावाची नोंद दिसली. आपलेही नाव गिनीज बुक आॅफ रेकॉर्डमध्ये असावे, असे मनात येऊन गेले. त्या दिवसापासून टायपिंगचं वेड लागले. रात्री-अपरात्री जेव्हा वेळ मिळेल तेव्हा अभ्यास सांभाळून टायपिंगचा वेग वाढविण्याचे प्रयत्न केले.
आदित्य पुढे म्हणाला, की खुर्शीद हुसेन यांनी ३ सेकंद ४३ मिनी सेंकदात ए टू झेड शब्द स्पेस पकडून एकूण ५१ वेळा की बोर्डची बटने दाबून आपले नाव गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये नोंदविले. हा त्यांचा उच्चांक मोडण्याची मनाशीच पक्की गाठ बांधून, त्या दृष्टीने प्रयत्न करण्याचे ठरविले.
याकरिता माझ्या पालकांची भरपूर साथ मिळाली. मी कित्येक की बोर्डही टायपिंग करताना तोडले. प्रत्येक वेळी नवीन की बोर्ड आणताना घरच्यांना पहिला बोर्ड तुटल्याचे सांगावे लागायचे. तेही शेवटी कंटाळून, हा फालतूपणा आता सोडून दे म्हणू लागले. माझी चिकाटी पाहून घरच्यांनी संपूर्ण सहकार्य केले. परत प्रवास सुरू झाला.
आज ३ सेंकद ३५ मिनी सेंकदात ए टू झेड शब्द स्पेस पकडून एकूण ५१ वेळा की बोर्डची बटने दाबू शकतो. म्हणजेच ८ मिनी सेकंदाचा फरक असल्याने माझ्या नावाची नोंद गिनीज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये होईल, असे ठामपणे आदित्यने सांगितले.