आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट! शिवसैनिकांचे जोरदार शक्तीप्रदर्शन
By नितिन गव्हाळे | Published: November 7, 2022 12:54 PM2022-11-07T12:54:13+5:302022-11-07T13:18:48+5:30
Aaditya Thackeray: विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले.
अकोला: युवा सेनेचे प्रमुख व शिवसेनेचे नेते आदित्य ठाकरे यांच्या संवाद यात्रेनिमित्त सकाळी ११ वाजता शिवणी विमानतळावर आगमन झाले. यावेळी शिवसैनिकांनी जय भवानी... जय शिवाजी अशा घोषणा देत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. विमानतळावर हजारो शिवसैनिकांनी गर्दी केली. विमानतळाबाहेरही शिवसैनिकांनी आदित्य ठाकरेंचे जोरदार स्वागत केले.
शहरात ठिकठिकाणी त्यांचे स्वागत करण्यात आले. युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचा सोमवारी नियोजित अकोला दौरा असल्याने, त्यांचे विमानाने सकाळी शिवणी विमानतळावर आगमन झाले. विमानतळावर कडेकोट पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. पासेस असलेल्या शिवसैनिकांनाच विमानतळाच्या आत सोडण्यात येत होते. विमानतळ परिसर व समोर हजारो शिवसैनिक आदित्य ठाकरेंच्या स्वागतासाठी जमले होते.
विमानतळावर आदित्य यांचे आगमन झाल्यावर शिवसेनेचे संपर्क प्रमुख खासदार अरविंद सावंत, विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे, आमदार नितीन देशमुख, सहसंपर्क प्रमुख सेवकराम ताथोड, जिल्हा प्रमुख गोपाल दातकर, मुकेश मुरूमकार, मंगेश काळे, श्रीरंग पिंजरकर, राहुल कराळे, देवश्री ठाकरे, शुभांगी किनगे, अकोटच्या माजी नगराध्यक्ष डॉ. मनिषा मते, प्रा. प्रकाश डवले, मनिष मोहोड, अक्षय खुमकर आदींनी त्यांचे स्वागत केले.
विमानतळाच्या बाहेर आदित्य ठाकरे यांच्या वाहनांचा ताफा आल्यावर, जमलेल्या हजारो शिवसैनिकांना, त्यांनी कारमधून बाहेर येत अभिवादन केले. हस्तांदोलन करीत, त्यांचे स्वागत स्विकारले.
शिवसैनिकांनीकडून चौकाचौकांत स्वागत
युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी शिवणी येथे, नेहरू पार्क चौक, गांधी रोड, जय हिंद चौकात उत्स्फूर्त स्वागत केले. यावेळी शिवसैनिकांनी प्रचंड घोषणाबाजी करीत, जोरदार शक्तीप्रदर्शन केले. आदित्य यांच्या स्वागतासाठी शहरातील चौकांमध्ये भगव्या पताका, झेंडे आणि फ्लेक्स, बॅनर लावण्यात आले होते.
आदित्य ठाकरेंनी घेतली 'त्या' चहावाल्याची भेट!
अकोल्यातील नेहरू पार्क चौकातील चाय विक्रेता मुरलीधर माधवराव सुर्वें हे बाळासाहेब ठाकरे यांचे कट्टर समर्थक आहेत. त्यांच्या चहाच्या दुकानावर बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमा आहेत. त्यांची पूजा करून सुर्वेंचा दिनक्रम सुरू होतो. त्यामुळे आदित्य ठाकरे यांनी त्यांच्या दौऱ्यातून थोडा वेळ काढून मुरलीधर सुर्वे यांच्या चहाच्या दुकानाला भेट दिली आणि गुलाबहार घालून त्यांचा सत्कार केला. बाळासाहेब ठाकरेंप्रति सुर्वे यांची निष्ठा आणि प्रेम पाहुन आदित्य ठाकरे भारावून गेले होते.