५१७ शिक्षकांचे आजपासून समायोजन; २९ जानेवारीपर्यंत ठरविले वेळापत्रक
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 21, 2019 01:33 PM2019-01-21T13:33:32+5:302019-01-21T13:33:36+5:30
अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मराठी, उर्दू शिक्षकांच्या मिळून ५१७ नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात कमालीची दिरंगाई करण्यात आली.
अकोला : जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने विषय शिक्षकांच्या नियुक्तीसाठी मराठी, उर्दू शिक्षकांच्या मिळून ५१७ नावांच्या याद्या प्रसिद्ध केल्यानंतर त्यांना नियुक्ती देण्यात कमालीची दिरंगाई करण्यात आली. नियुक्तीसाठी शिक्षकांनी सातत्याने पाठपुरावा केल्यानंतर अखेर नियुक्ती देण्यासाठी २१ ते २९ जानेवारीपर्यंतचे वेळापत्रक निश्चित करण्यात आले. त्यानुसार समुपदेशनाने नियुक्तीला उद्या सोमवारपासून सुरुवात होणार आहे.
शिक्षण हक्क कायद्यानुसार सहावी ते आठवी विषय शिक्षकांची ५५३ पदे रिक्त असल्याने विषय शिक्षकांची नियुक्ती करावी आणि सेवाज्येष्ठतेनुसार समुपदेशनाने ही पदे भरावीत, शिक्षकांच्या बदल्यांमध्ये अकोला जि.प.मध्ये विषय शिक्षकांच्या पदभरतीअभावी सहायक शिक्षक अतिरिक्त झाल्याने, त्यांना रॅन्डम राउंडमध्ये तालुका बदलून नियुक्ती दिली होती. तीन महिने उलटूनही विषय शिक्षकांच्या नियुक्तीचा प्रश्न मार्गी लागला नाही. दरम्यान, गेल्या शुक्रवारी जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी विषय शिक्षक नियुक्तीच्या फाइलवर स्वाक्षरी केली. त्यावेळी सोमवारपासून विषय शिक्षक नियुक्तीची प्रक्रिया सुरू होण्याची शक्यता होती; मात्र पंचायत समिती स्तरावर शालेय क्रीडा स्पर्धा सुरू झाल्या. त्यामध्ये बदली होणाºया शिक्षकांचाही सहभाग आहे. पदस्थापना प्रक्रिया राबविल्यास त्यांची बदली होईल. त्यांची शाळा बदल होईल. या काळात शालेय स्पर्धांमध्ये अडचण येण्याची शक्यता असल्याने पदस्थापनेची प्रक्रिया पुढे ढकलण्यात आली. आता सहा दिवसांच्या कालावधीत शिक्षकांना समुपदेशनाने पदस्थापना दिली जाणार आहे.
- उर्दू माध्यमाचे दोन दिवस
उर्दू माध्यमातील १२१ शिक्षकांचे विषयनिहाय समायोजन करण्यासाठी २१ व २२ जानेवारी असे दोन दिवस ठेवण्यात आले आहे. त्यामध्ये सामाजिकशास्त्राचे १०६, भाषा-९२, विज्ञान-१७९ एवढ्या शिक्षकांचे समायोजन होणार आहे. त्याचवेळी रिक्त जागांची संख्या भाषा-३१, विज्ञान-५८, सामाजिकशास्त्र-२१ आहे.
- मराठी माध्यमातही रिक्त जागा कमी, शिक्षक अतिरिक्त
मराठी माध्यमात विज्ञान विषयाचे शिक्षक ३९६ आहेत. त्यांच्यासाठी रिक्त जागा २८७ आहेत. समाजशास्त्र विषयासाठी २९९ शिक्षक असताना त्यांच्यासाठी ५९ जागा आहेत, तर भाषा विषयाचे ५३७ शिक्षक असताना ११६ जागा रिक्त असल्याची माहिती आहे. त्यामुळे समुपदेशानंतर शिक्षकांवर पुन्हा एकदा अन्याय होण्याची शक्यता आहे.