खराब डाळीच्या पुरवठ्याने प्रशासनही गोत्यात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 7, 2019 12:00 PM2019-10-07T12:00:08+5:302019-10-07T12:00:18+5:30
जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत.
अकोला : शासनाने शेतकऱ्यांकडून ‘एफएक्यू’ दर्जाचा हरभरा घेऊन त्याची भरडाई करणाºया मुंबईतील सप्तशृंगी कंपनीने विदर्भातील अनेक जिल्ह्यांतील शिधापत्रिकाधारकांना खराब डाळीचा पुरवठा केला आहे. काही जिल्ह्यांत प्रशासनाच्या दबावामुळे डाळ वाटप झाले तरी अकोला जिल्ह्यातील खराब डाळ वाटप गोदामपालासह पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या अंगलट येण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, नाफेडने खरेदी केलेल्या हरभºयाची भरडाई करण्यासाठी शासनाने नोव्हेंबर २०१८ मध्येच सप्तशृंगी कंपनीकडे काम दिले होते.
अंत्योदय, अन्न सुरक्षा योजनेंतर्गत प्राधान्य गटातील शिधापत्रिकाधारकांना प्रतिमाह तूर व हरभरा डाळ या दोन डाळींपैकी एक डाळ प्रत्येकी एक किलो ५५ रुपयेप्रमाणे वाटप करण्याचा आदेश शासनाकडून देण्यात आला. त्यासाठी हरभरा, तुरीची उचल करणे, भरडाई करणे, तयार डाळ एक किलोच्या पाकिटात बंद करून शासकीय गोदामात पोहोचविण्याचे काम नवी मुंबईतील सप्तशृंगी कंपनीला देण्यात आले. (एनईएमएल एनसीडीईएक्स ग्रुप कंपनी)मार्फत ही नियुक्ती करण्यात आली. शेतकºयांकडून खरेदी केलेला त्या कंपनीकडे नागपूर, अमरावती, औरंगाबाद, नाशिक या दोन झोनमधील जिल्ह्यांत डाळ पुरवठ्याचे काम आहे. या कंपनीने शासनाकडून अनेक जिल्ह्यांत खराब हरभरा डाळीचा पुरवठा झाला आहे. नाफेडकडे नोंदणी केल्यानंतर शेतकºयांचा एफएक्यू दर्जाचेच धान्य खरेदी केले जाते. अनेक शेतकºयांना तर एफएक्यूच्या निकषात बसत नसल्याने खरेदी केंद्रावरून परत करण्याचा उद्दामपणाही केला जातो. त्या शेतकºयाच्या नफ्या-तोट्याचा विचारही केला जात नाही. त्याचवेळी सप्तशृंगी कंपनीला पाठीशी घालण्याचा प्रकारही शासन स्तरावर घडत आहे.
मार्चपासून आली खराब डाळ
अकोला जिल्ह्यातील गोदामात मार्च २०१९ मध्ये काळसर, ओली असलेली खराब डाळ प्राप्त झाली. ती डाळ खराब असल्याचे दुकानदारांना पुरवठा झाल्यानंतर पुढे आले. डाळींच्या पाकिटात तर पीठच झाले आहे. ओल्या डाळींचे एकजीव गोळे तयार झाले आहेत. दुकानदारांकडून शिधापत्रिकाधारक डाळ घेत नसल्याने ओरड सुरू झाली. त्यामुळे दुकानदारांनी डाळ परत करण्याचा सपाटा लावला. या प्रकाराने गोदामपाल जंगले, पुरवठा विभागातील अधिकारी-कर्मचारी चांगलेच धास्तावले. साठ्यातील ५० ते ६० क्विंटल डाळ खराब असल्याची अधिकाºयांची माहिती आहे. त्याची जबाबदारीही निश्चित केली जात आहे.
दुकानदारांना भुर्दंड
विशेष म्हणजे, खराब डाळ शिधापत्रिकाधारकांनी घेतली नाही. ती परत गोदामात आणण्याचा भुर्दंडही अनेक दुकानदारांना पडला आहे. ही प्रक्रियाही नियमबाह्यपणे राबविण्यात आल्याचे दुकानदारांनी सांगितले आहे.
गत काही महिन्यांपासून सप्तशृंगी मिलर्सकडून प्राप्त डाळ खराब असणे, या प्रकाराची जबाबदारी निश्चित केली जाईल. दोषींवर कारवाई केली जाईल. - बी. यू. काळे, जिल्हा पुरवठा अधिकारी, अकोला.
डाळ खराब असल्याची माहिती वरिष्ठांना दिली आहे. साठ्यातील खराब हरभरा डाळीचा अहवाल जिल्हा पुरवठा अधिकारी यांना सादर केला जाईल. त्यांच्या आदेशानुसार पुढील कार्यवाही होईल.
- योगेश जंगले, गोदाम व्यवस्थापक, शासकीय गोदाम, अकोला.