सडकछाप दारुड्यांपुढे प्रशासन हतबल; राज्य उत्पादन शुल्क म्हणते मनुष्यबळ नाही
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2019 01:01 PM2019-05-03T13:01:20+5:302019-05-03T13:01:30+5:30
अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे.
अकोला : शहरातील मुख्य चौकात कुठेही बसा अन् खुशाल ढोसा, अशी स्थिती झाली आहे. दिवसेंदिवस हा प्रकार वाढत असून, सुरक्षेच्या दृष्टिकोनातून हा प्रकार गंभीर आहे; परंतु आमच्याकडे मनुष्यबळ नसल्याचे सांगत राज्य उत्पादन शुल्क सडकछाप तळीरामांपुढे हतबल झाल्याचे वास्तव समोर आले आहे.
अकोला शहराची ओळख संवेदनशील शहर म्हणून आहे. किरकोळ वादातून येथे गंभीर गुन्हे घडल्याच्या घटनाही घडल्या आहेत. अशा परिस्थितीत पोलिसांच्या नाकावर टिच्चून शहरातील मुख्य चौकात बेकायदेशीर होत असलेली दारू विक्री आणि कुठेही बसून खुशाल ढोसण्याची प्रशासनाची मूकसंमती ही मोठ्या गुन्ह्याची पुनरावृत्ती करू शकते. अशा स्थळांवर कारवाईसंदर्भात राज्य उत्पादन शुल्क विभागाला माहिती विचारली असता, आमच्याकडे मनुष्यबळाचा अभाव आहे; मात्र पोलीस प्रशासनाच्या सहकार्याने शहरात कारवाया करण्यात येत असल्याचे त्यांच्याकडून सांगण्यात आले; परंतु परिस्थिती विपरीत असून, शहरात उघड्यावरच बेकायदेशीररीत्या दारू विक्री आणि मुख्य चौकातच तळीरामांचा गोतावळा जमत असल्याचे वास्तव ‘लोकमत’ने उघडकीस आणले आहे. वाढत्या गुन्हेगारीत शहरात कायदा व सुव्यवस्था कायम राखणे पोलिसांसमोर मोठे आव्हान आहे.
महिला सुरक्षेचा प्रश्न गंभीर
शहरातील अनेक सायंकाळी कार्यालयीन वेळ संपल्यावर घरी परतण्याच्या घाईत असतात, तर विद्यार्थिनी शिकवणी वर्गातून घरी येत असतात. अशातच वाटेत दारुड्यांकडून घालण्यात येणारा गोंधळ आणि नशेत करण्यात येणारे अशोभनीय कृत्य महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून धोकादायक आहे. राज्य उत्पादन शुल्क तसेच पोलीस प्रशासनाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन आवश्यक कारवाई करण्याची गरज आहे.
मनुष्यबळ कमी असल्याने प्रत्येक ठिकाणी लक्ष देणे शक्य नाही; मात्र पोलिसांच्या मदतीने उघड्यावर दारू पिणाऱ्यांवर मुंबई दारूबंदी कायद्यानुसार कारवाया सुरूच आहेत.
- राजेश कावळे, अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, अकोला.