ग्रामपंचायत निवडणुकीत प्रशासन व्यस्त, पाण्यासाठी ग्रामस्थ त्रस्त
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 10, 2021 04:14 AM2021-01-10T04:14:19+5:302021-01-10T04:14:19+5:30
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत असून, कोसो दूर ग्रामस्थ भटकंती करीत असल्याचे ...
वाडेगाव : बाळापूर तालुक्यातील वाडेगाव येथील ग्रामस्थांची पिण्याच्या पाण्यासाठी पायपीट होत असून, कोसो दूर ग्रामस्थ भटकंती करीत असल्याचे चित्र पहायला मिळत आहे.
ग्रामपंचायत निवडणुकीच्या कामात प्रशासन व्यस्त असताना ग्रामस्थांची पाण्यासाठी भटकंती हाेत आहे. मागील आठवड्यात पातूर-बाळापूर रस्त्याचे काम सुरू असताना एका ठिकाणी पाइपलाइन फुटली होती. तेव्हापासून आज जवळपास एकूण १५ ते १८ दिवस होऊनसुद्धा ग्रामस्थांच्या घराघरात नळाचे पाणी पोहाेचत नसल्याचे ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत. ही तक्रार सांगावी तर कोणाला? याबाबत ग्रामस्थ संमभ्रात आहेत. प्रशासक व प्रभारी ग्रामसचिव सुविधा देण्याकडे दुर्लक्ष करीत आहेत. गावातील नेते निवडणुकीच्या प्रचारात व्यस्त आहेत. यामुळे गावातील ग्रामस्थांची पाणी समस्या कोण दूर करणार, याकडे ग्रामस्थांचे लक्ष लागले आहे.
वाडेगाव येथील मागील काही दिवसांपासून पाणी पुरवठा बंद झाल्याने गोडे पाणी पिण्यासाठी पैसे खर्च करून पाण्याची कॅन विकत घ्यावी लागत आहे. येथे नळयोजना अंतर्गत नागरिकांना पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु पाणी पुरवठा करण्यात येत असलेल्या तामशी येथील विहिरीवरील विद्युत मोटार पंपाचे स्टाटर जळालेल्या अवस्थेत आहे. अकोला मार्गालगत असलेल्या खैवाडीमधील विहिरीतील मोटर पंप जळाले आहे, तर पाचदेवुळ व चांन्नी फाटा येथील होत असलेल्या पाणीपुरवठ्याची जलवाहिनी मार्गाच्या रुंदीकरण करण्यात येत असलेल्या कामामुळे फुटल्याने पाणीपुरवठा बंद आहे. त्यामुळे गावातील काही भागांत बारमाही अल्पप्रमाणात होत असलेला पाणीपुरवठा बंद असल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे, तर ग्रामपंचायत निवडणुकीत उमेदवारांकडून पाणीप्रश्न साेडविला जाईल, असे आश्वासन दिल्या जात आहे. भीषण पाणीटंचाईच्या समस्येचे काय? असा प्रश्न नागरिक यांच्याकडून उपस्थित केल्या जात आहे. तरी ग्रामस्थांच्या सोयिकरिता पाणी समस्यां दूर करण्यात यावी, अशी मागणी निखिल कडरकर, राहुल मसने, शांताराम शेंगोकार, संकेत भटकर, महादेव लोखंडे यांच्यासह ग्रामस्थांकडून हाेत आहे.
..................
ग्राम प्रशासनाने भीषण पाणीटंचाई लक्षात घेता ही समस्या लवकरात लवकर दूर करण्यात यावी.
महादेव लोखंडे, वाडेगाव
.....................
भीषण पाणीटंचाई संदर्भात वरिष्ठांकडे पाठपुरावा करून सर्व तांत्रिक अडचण दूर करण्याची मागणी करण्यात येईल.
अंकुश शहाणे, वाडेगाव