डाळींच्या साठेबाजीवर प्रशासनाची करडी नजर !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:22 AM2021-08-21T04:22:49+5:302021-08-21T04:22:49+5:30
संतोष येलकर. अकोला: डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासह साठेबाजी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात डाळींच्या साठेबाजीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार ...
संतोष येलकर.
अकोला: डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासह साठेबाजी होऊ नये, यासाठी जिल्ह्यात डाळींच्या साठेबाजीवर जिल्हा प्रशासनाची करडी नजर राहणार आहे. त्यासाठी जिल्हा पुरवठा आणि महसूल विभागाच्या पथकांकडून डाळींच्या साठ्याची तपासणी सुरू करण्यात येत आहे. बाजारात डाळींची विक्री निर्धारित दरापेक्षा अधिक दराने होऊ नये, तसेच साठेबाजी करून दरवाढ होऊ नये आणि डाळींचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी जिल्ह्यात डाळींचा साठा आणि विक्रीवर जिल्हा प्रशासनामार्फत लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. त्यामध्ये विविध डाळींचा साठा तसेच निर्धारित दरापेक्षा अधिक दराने डाळींच्या विक्रीची तपासणी जिल्हा पुरवठा अधिकारी कार्यालयांतर्गत अधिकारी आणि महसूल विभागांतर्गत जिल्ह्यातील तहसील कार्यालयांतील अधिकाऱ्यांच्या पथकांकडून तपासणी करण्यात येणार आहे. या तपासणी मोहिमेत डाळींची साठेबाजी आणि निश्चित करण्यात आलेल्या दरापेक्षा अधिक दराने डाळींची विक्री करणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी दिला आदेश!
जिल्ह्यात डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासह साठेबाजी होऊ नये, यासाठी डाळींच्या साठ्याची आणि विक्रीची तपासणी करण्याचा आदेश जिल्हाधिकारी नीमा अरोरा यांनी बुधवारी जिल्हा पुरवठा अधिकाऱ्यांसह जिल्ह्यातील तहसीलदारांना दिला. त्यानुसार पथकांमार्फत जिल्ह्यात डाळींच्या साठ्यासह विक्रीची तपासणी करण्यात येणार आहे.
‘या’ डाळींच्या साठ्याची
केली जाणार तपासणी!
जिल्ह्यात तूर, मूग, उडीद, हरभरा, मसूर इत्यादी डाळींच्या साठ्यासह विक्रीची तपासणी जिल्हा प्रशासनाच्या पथकांकडून केली जाणार आहे.
साठा अन् विक्रीची ‘या’
ठिकाणी होणार तपासणी!
जिल्ह्यातील डाळ उत्पादक, घाऊक आणि किरकोळ डाळ विक्रीच्या ठिकाणी जिल्हा प्रशासनाच्या पथकांकडून डाळींचा साठा तसेच डाळींची विक्री निर्धारित दरानुसार होते की नाही, यासंदर्भात तपासणी करण्यात येणार आहे.
डाळींचे दर नियंत्रणात असावे, साठेबाजी होऊ नये, यासाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार जिल्ह्यात डाळींच्या साठ्याची तपासणी तसेच डाळींची विक्री निर्धारित दरानुसार होते की नाही, यासंदर्भात महसूल व पुरवठा विभागाच्या पथकांमार्फत तपासणी सुरू करण्यात येत आहे.
बी. यू. काळे
जिल्हा पुरवठा अधिकारी