कोरोनाच्या संभाव्य लाटेसाठी प्रशासन सज्ज
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2020 10:34 AM2020-11-16T10:34:26+5:302020-11-16T10:36:53+5:30
Akola Corona News सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक खाटा उपलब्ध असून, १० किलो लीटर क्षमतेची ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे.
अकोला: राज्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात असताना जिल्ह्यातील तसा धोका दिसून येत आहे. गत दीड महिन्यानंतर ॲक्टिव्ह रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ झाली आहे. अकोलेकरांसाठी हा चिंतेचा विषय असून, यावर नियंत्रणासाठी इतरांपासून सुरक्षीत अंतर हाच उपाय असल्याचे वैद्यकीय अधिकारी सांगतात. नागरिकांना विशेष खबरदारी घेण्याचे आवाहन करत आरोग्य विभागही दुसऱ्या लाटेसाठी सज्ज झाला आहे. कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा धोका पाहता राज्यभरात आरोग्य विभागाला तयारीच्या सूचना देण्यात आल्या आहेत. त्यानुसार, जिल्हा प्रशासनासह आरोग्य विभाग सज्ज झाले आहे. जिल्ह्यात तब्बल दीड महिन्यानंतर रुग्णसंख्या वाढीस सुरुवात झाल्याने अकोलेकरांची चिंता वाढली आहे. तर दुसरीकडे आरोग्य विभाग रुग्णांवर उपचारासाठी तयार आहे. सर्वोपचार रुग्णालयात आवश्यक खाटा उपलब्ध असून, १० किलो लीटर क्षमतेची ऑक्सिजन टँक बसविण्यात आली आहे. शिवाय, जिल्हा स्त्री रुग्णालय व मूर्तिजापूर ग्रामीण रुग्णालयातही ऑक्सिजन टँक प्रस्तावित असून, लवकरच या ठिकाणी टँक बसविण्यात येणार आहे. त्यामुळे यावेळेस रुग्णांना ऑक्सिजनची कमी भासणार नाही. बंद करण्यात आलेली कोविड केअर सेंटर कोणत्याही क्षणी सुरू करणे शक्य असल्याने आरोग्य विभाग पूर्णत: सज्ज आहे. मात्र ही स्थिती येऊ नये यासाठी नागरिकांनी इतरांपासून सुरक्षीत अंतर राखून मास्कचा वापर करावा. तसेच नियमित हात स्वच्छ धुवावेत, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाचे एकूण रुग्ण - ८,७१६
उपचारानंतर बरे झालेले - ८,१२५
सध्या उपचार सुरू असलेले रुग्ण - ३०८
कोरोनाचे एकूण बळी - २८३
सुरू असलेले कोविड सेंटर - ००
एकूण कोविड सेंंटर - ०७
होम आयसोलेशन - --
सेंटर, डॉक्टर आणि औषधांची तयारी
सध्या जिल्ह्यातील कोविड केअर सेंटर बंद असून, कोविड रुग्णालयांमध्ये खाटा रिकाम्या आहेत. बंद करण्यात आलेले सेंटर कोणत्याही क्षणी सुरू करण्याची आरोग्य विभागाची तयारी आहे. तर मनुष्यबळ आणि औषध साठाही मुबलक असल्याचे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी सांगितले.
लाट येऊ नये म्हणून
सध्या कोरोनाच्या दुसऱ्या लाटेची भीती वर्तविली जात आहे. त्यासाठी आरोग्य विभाग राज्यभरात तयारीला लागले आहे. आराेग्य विभाग तयारीत असले तरी कोरोनाची दुसरी लाट आपल्याच बेफिकिरीमुळे येऊ शकते. त्यामुळे हा धोका टाळण्यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेत इतरांपासून सुरक्षीत अंतर ठेवणे, नियमित मास्कचा वापर करणे, तसेच साबणाने वारंवार हात स्वच्छ धुणे आवश्यक आहे. ही प्रत्येकाची जबाबदारी असून, याचे सर्वांनी पालन करावे, असे आवाहन आरोग्य विभागातर्फे करण्यात आले आहे.
कोरोनाची रुग्णसंख्या वाढल्यास आरोग्य विभाग पूर्णत: सज्ज आहे; मात्र रुग्णसंख्या वाढू नये यासाठी नागरिकांनी विशेष खबरदारी घेण्याची गरज आहे. नागरिकांनी फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणे आवश्यक असून, मास्कचा वापर आणि नियमित हत धुणे गरजेचे आहे.
- डॉ. राजकुमार चव्हाण, जिल्हा शल्य चिकित्सक, अकोला