निवडणूक खर्च भागविण्यासाठी प्रशासनाला १.४८ कोटी प्राप्त!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 5, 2020 02:48 PM2020-01-05T14:48:17+5:302020-01-05T14:48:23+5:30
निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
अकोला : जिल्हा परिषद आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी अखेर १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ डिसेंबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला.
जिल्हा परिषदेचे ५३ गट आणि जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या १०६ गणांसाठी निवडणूक घेण्यात येत आहे. या निवडणुकीसाठी मतदार याद्यांची छपाई, मतदान अधिकारी व कर्मचाऱ्यांचे मानधन, मतदान पथकांसाठी बस व्यवस्था, वाहनांचा इंधन खर्च, शामियाना, स्टेशनरी यासह निवडणूकविषयक इतर खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. त्यानुषंगाने जिल्हा परिषद व पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी आवश्यक असलेला निधी उपलब्ध करून देण्याची मागणी जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत राज्य निवडणूक आयोगाकडे २३ डिसेंबर रोजी पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुसार जिल्हा परिषद व जिल्ह्यातील पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत ३ जानेवारी रोजी जिल्हाधिकारी कार्यालयाला प्राप्त झाला आहे. उपलब्ध निधी निवडणूक खर्च भागविण्यासाठी जिल्ह्यातील सातही तहसील कार्यालय स्तरावर वितरित करण्यात आला आहे.
जिल्हा परिषद व जिल्ह्यातील सातही पंचायत समित्यांच्या निवडणुकीचा खर्च भागविण्यासाठी ५ कोटी रुपयांच्या निधीची आवश्यकता आहे. त्यानुषंगाने निधी उपलब्ध करून देण्याची मागणी राज्य निवडणूक आयोगाकडे पत्राद्वारे करण्यात आली होती. त्यानुषंगाने १ कोटी ४८ लाख रुपयांचा निधी शासनामार्फत प्राप्त झाला आहे.
- संजय खडसे,
निवासी उपजिल्हाधिकारी तथा
नोडल अधिकारी, जिल्हा परिषद, पंचायत समिती निवडणूक.