पडीत वॉर्ड बंद करण्यासाठी प्रशासन सरसावले
By admin | Published: January 31, 2015 12:39 AM2015-01-31T00:39:49+5:302015-01-31T00:39:49+5:30
कंत्राटदार-नगरसेवकांच्या संगनमतावर टाच.
अकोला : पडीत वॉर्डांंच्या माध्यमातून उखळ पांढरे करणार्या नगरसेवक-कंत्राटदारांच्या संगनमताला लवकरच आळा घातला जाणार आहे. पडीत वॉर्ड ही संकल्पना मोडीत काढण्यासाठी प्रशासन सरसावले असून, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात ते बंद केले जाणार असल्याची माहिती आहे. संबंधित प्रभागात आस्थापनेवरील सफाई कामगारांच्या नियुक्तीचे नियोजन केले जाणार असले तरी या प्रयोगात प्रशासन कितपत यशस्वी ठरते, याबद्दल साशंकता निर्माण झाली आहे.
शहरातील ३६ प्रभागांपैकी पडीतच्या २१ प्रभागांमध्ये (४२ वॉर्ड) साफसफाई व स्वच्छतेच्या कामासाठी मनपाने खासगी कंत्राटदारांची नियुक्ती केली. बहुतांश पडीत प्रभागातील साफसफाईचे कंत्राट नगरसेवकांच्या कार्यकर्त्यांनी मिळवले. प्रभागातील नाल्या, सर्व्हिस लाइन, रस्त्यांची दैनंदिन साफसफाई करण्यासह झाडे-झुडुपे, गवत काढण्यासाठी संबंधित कंत्राटदारांनी १५ खासगी सफाई कर्मचार्यांची नियुक्ती केली. याबदल्यात मनपाकडून महिन्याकाठी ५0 हजार रुपयांची घसघशीत रक्कम कंत्राटदारांच्या खिशात कोंबली जाते. पडीत प्रभागांमध्ये दैनंदिन ६00 सफाई कर्मचारी काम करतात, असा दावा नगरसेवक व कंत्राटदारांकडून केला जातो. दुसरीकडे सभागृहात सर्वच नगरसेवक प्रभागात नियमित साफसफाई होत नसल्याचे खापर प्रशासनाच्या मस्तकी फोडतात. सफाईची खासगी कंत्राटं रद्द करण्याची भाषा मात्र कोणीही वापरत नाही, हे येथे उल्लेखनीय. स्वच्छतेच्या परिस्थितीत कोणतीही सुधारणा होत नसल्याचे पाहून फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात पडीत वॉर्ड ही संकल्पना बंद केली जाणार आहे. याकरिता उपायुक्त चंद्रशेखर गुल्हाने तयारीला लागल्याची माहिती आहे.