तूर डाळीच्या साठेबाजांवर ‘वाॅच’!
By संतोष येलकर | Published: April 22, 2023 04:32 PM2023-04-22T16:32:47+5:302023-04-22T16:33:13+5:30
जिल्हाधिकाऱ्यांचा आदेश: तपासणी पथक गठित; २८ एप्रिलपर्यंत तपासणी
संतोष येलकर, अकोला: तूर डाळीच्या दरवाढ नियंत्रणासाठी अवैध साठेबाजीवर जिल्ह्यात प्रशासनाची करडी नजर राहणार असून, जिल्हाधिकारी निमा अरोरा यांच्या आदेशानुसार, १९ एप्रिल रोजी जिल्हास्तरीय तपासणी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामार्फत होणाऱ्या तपासणीत तूर डाळीच्या साठ्याची पडताळणी करण्यात येणार असून, येत्या २८ एप्रिलपर्यंत डाळीची साठा तपासणी केली जाणार आहे.
तूर आणि उडीद डाळींचे दर सतत वाढत असल्याने, डाळींचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी केंद्र शासनाच्या अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्रालय नवी दिल्ली येथील उपसंचालक सुभाषचंद्र मीना यांच्या नेतृत्वात त्रिसदस्यीय अधिकाऱ्यांचे केंद्रीय पथक शनिवार, १५ एप्रिल रोजी अकोला दौऱ्यावर आले हाेते. त्यानंतर, जिल्ह्यात तूर डाळीचे दर नियंत्रणासाठी आणि अवैध साठवणुकीवर निर्बंध लावण्याच्या दृष्टीने तूर डाळीच्या साठ्याची पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी निमा अरोरा यांनी १९ एप्रिल रोजी दिलेल्या आदेशानुसार, जिल्हास्तरीय तपासणी पथक गठित करण्यात आले आहे. या पथकामार्फत येत्या २८ एप्रिलपर्यंत गोदाम आणि साठवणुकीच्या ठिकाणी तूर व तूर डाळीच्या साठ्याची तपासणी करून पडताळणी केली जाणार आहे.
जिल्ह्यात ३.५० लाख क्विंटल, तूर खरेदी; साठेबाजीची शक्यता
जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांच्या कालावधीत ३ लाख ५० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. मोठ्या प्रमाणात तूर खरेदी करण्यात आल्याने, तूर व तूर डाळ साठ्याची साठेबाजी होण्याची शक्यता आहे. त्या अनुषंगाने तूर डाळीचे दर नियंत्रित ठेवण्यासाठी आणि साठेबाजीला आळा घालण्याकरिता तूर व तूर डाळ साठ्याची तपासणी करण्यात येणार आहे.
तपासणीत ऑनलाइन नोंदणीची तपासणी!
जिल्हास्तरीय पथकाच्या तपासणीत दालमिल मालक, घाऊक विक्रेता व साठवणूकदारांनी खरेदी केलेली तूर व तूर डाळीच्या व्यवहाराची केंद्र शासनाच्या पोर्टलवर ऑनलाइन नोंदणी करण्यात आली की नाही, याबाबतची तपासणीही केली जाणार आहे.
तपासणी पथकात यांचा आहे समावेश!
जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानुसार गठित करण्यात आलेल्या जिल्हास्तरीय पथकात पथकप्रमुख जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू. काळे यांच्यासह अकोल्याचे तहसीलदार, अन्नधान्य वितरण अधिकारी, निरीक्षण अधिकारी, शहर व ग्रामीण विभागाचे पुरवठा निरीक्षक इत्यादींचा समावेश आहे, असे तपासणी पथकप्रमुख तथा जिल्हा पुरवठा अधिकारी बी.यू.काळे यांनी सांगीतले.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"