पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2019 12:38 PM2019-08-17T12:38:52+5:302019-08-17T12:39:00+5:30
पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३३ काँक्रीट रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे.
अकोला : लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधा पुरविण्यासाठी सन २०१९-२० वर्षासाठी जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील ३३ रस्ते कामांना शासनामार्फत ८ आॅगस्ट रोजी प्रशासकीय मान्यता देण्यात येत आली असून, मंजूर रस्ते कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.
लोकप्रतिनिधींनी सुचविलेल्या ग्रामीण भागातील गावांतर्गत मूलभूत सुविधांच्या कामांसंदर्भात शासनाच्या ग्रामविकास व पंचायत विभागामार्फत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला. त्यामध्ये सन २०१९-२० या वर्षासाठी अकोला जिल्ह्यातील पातूर तालुक्यातील विविध गावांमध्ये ३३ काँक्रीट रस्ते कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. मंजूर रस्ते कामांसाठी एक कोटी रुपयांचा निधी वितरीत करण्यास शासनामार्फत मंजुरी देण्यात आली असून, मंजूर निधी शासनामार्फत लवकरच जिल्हा परिषदेला प्राप्त होणार आहे. मंजूर कामांवर निविदा प्रक्रिया सुरू करून, ज्या कामांसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे, त्याच कामांवर खर्च करणे बंधनकारक राहणार आहे, तसेच मंजूर केलेल्या कामांसाठी जिल्हा परिषदेच्या प्रचलीत कार्यपद्धतीनुसार प्रशासकीय व तांत्रिक मंजुरी, निविदा काढणे व स्वीकारणे इत्यादी प्रकारची कार्यवाही सक्षम प्राधिकाऱ्याकडून करून घेण्याची जबाबदारी जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांची राहणार असल्याचेही शासन निर्णयात नमूद करण्यात आले आहे.