आमदार निधीतील केवळ ४ कोटींच्या कामांना प्रशासकीय मान्यता
By admin | Published: December 9, 2015 02:54 AM2015-12-09T02:54:05+5:302015-12-09T02:54:05+5:30
आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत ८ कोटींची कामे रेंगाळली.
संतोष येलकर/अकोला : आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत जिल्हय़ातील सात आमदारांसाठी सन २0१५-१६ या वर्षात १२ कोटी ७६ लाख ९६ हजारांचा निधी शासनामार्फत उपलब्ध झाला. उपलब्ध निधीपैकी ८ डिसेंबरपर्यंत केवळ ४ कोटी ३0 लाख ९४ हजार रुपयांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील कामे अद्याप रेंगाळली असून, येत्या तीन महिन्यांच्या कालावधीत ही कामे मार्गी लागणार की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण होत आहे.
विधानसभा सदस्य आणि विधान परिषद सदस्य असलेल्या आमदारांना त्यांच्या मतदारसंघातील विकासकामे करण्यासाठी आमदार स्थानिक विकास कार्यक्रमांतर्गत शासनामार्फत दरवर्षी प्रत्येक आमदारास दरवर्षी दोन कोटी रुपयांचा निधी शासनामार्फत उपलब्ध करून दिला जातो. त्यानुसार सन २0१५-१६ या वर्षात जिल्हय़ातील सात आमदारांना आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत गत २३ एप्रिल रोजी १२ कोटी ७६ लाख ९६ हजार रुपयांचा निधी शासनामार्फत जिल्हा नियोजन विभागाकडे प्राप्त झाला. त्यामध्ये आमदार रणधीर सावरकर, आमदार गोवर्धन शर्मा, आमदार प्रकाश भारसाकळे, आमदार हरिष पिंपळे, आमदार बळीराम सिरस्कार, आमदार गोपीकिशन बाजोरिया, जिल्हय़ाचे पालकमंत्री डॉ. रणजित पाटील यांच्या आमदार स्थानिक विकास निधीचा (फंड) समावेश आहे. सातही आमदारांसाठी स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीपैकी ८ डिसेंबरपर्यंत ४ कोटी ३0 लाख ९४ हजार रुपयांच्या विकास कामांना जिल्हाधिकार्यांमार्फत प्रशासकीय मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील कामांना अद्याप प्रशासकीय मिळणे बाकी आहे. आमदार फंडातील विकासकामे येत्या मार्च अखेरपर्यंत करण्यास केवळ तीन महिन्यांचा कालावधी उरला आहे. त्यामुळे जिल्हय़ातील सातही आमदारांच्या फंडातील ८ कोटी ४६ लाख २ हजार रुपयांच्या निधीतील रेंगाळलेली कामे तीन महिन्यांच्या कालावधीत मार्गी लागणार की की नाही, याबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
*आमदार निधीतून करावयाची कामे!
आमदार स्थानिक विकास कार्यक्रम अंतर्गत उपलब्ध निधीतून आमदारांच्या मतदारसंघात रस्ते, नाल्या, विंधन विहिरी, व्यायामशाळांना साहित्य वाटप, स्मशानभूमी आवारभिंत, घनकचरा व सांडपाणी व्यवस्थापन इत्यादी कामे करण्यात येतात.