अकोट बाजार समितीत प्रशासकीय, आर्थिक गैरव्यवहार!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 4, 2021 04:19 AM2021-04-04T04:19:06+5:302021-04-04T04:19:06+5:30
अकोटः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाची प्रशासकीय कारकिर्द संशयास्पद आहे. त्यांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी आदेशित केलेल्या चौकशीसह विविध ...
अकोटः येथील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सचिवाची प्रशासकीय कारकिर्द संशयास्पद आहे. त्यांच्या संदर्भात पालकमंत्र्यांनी आदेशित केलेल्या चौकशीसह विविध प्रकरणात चौकशी सुरू असताना सचिव पदावर राहणे उचित होणार नाही. त्यामुळे पुढील आदेशापर्यंत सचिव राजकुमार माळवे यांना सचिव पदावरून तात्काळ निलंबित करावे, बाजार समिती प्रशासकीय व आर्थिक अनियमीततेचा अभ्यास करुन याबाबत गुन्हा दाखल करण्यासाठी तीन संचालकांची समिती बनवून त्यांना अधिकार प्रदान करण्यात यावे, संचालक मंडळाची विशेष सभा बोलावून ठराव घ्यावा, अशी मागणी पाच संचालकांनी बाजार समिती सभापतींकडे दिलेल्या तक्रारीतून केली आहे.
पाच संचालकांनी दिलेल्या तक्रारीनुसार, सचिव राजकुमार माळवे यांच्याबाबत सहायक निबंधकांनी चौकशी करुन त्यांना दोषी असल्यामुळे सचिवावर शिस्तभंगाची कार्यवाही करावी असा स्पष्ट अहवाल दिला आहे. संचालक मंडळाने यापूर्वी आर्थिक नुकसान करुन फसवणूक केल्याबाबत ठराव घेतलेला आहे. अप्पर विशेष लेखापरीक्षकांनी सन २०१६-१७ या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण करुन प्रशासकीय व आर्थिकबाबी नमूद करुन महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार खरेदी-विक्री अधिनियमचे कलम ४० ब अन्वये बाजार समितीची चौकशी करण्याबाबत अहवाल दिला आहे. या अहवालावरुन जिल्हा उपनिबंधकांनी त्रिसदस्य चौकशी आदेशित केली आहे. सीसीआयमार्फत गतवर्षी कापुस खरेदी प्रक्रियेदरम्यान जिल्हा उपनिबंधक कार्यालयाला शेतकऱ्यांच्या याद्या वेळेत सादर केल्या नाहीत. त्यामुळे प्रशासकीय दिरंगाई सिद्ध झाली आहे. विशेष म्हणजे सन २०१९-२० या आर्थिक वर्षाचे लेखापरीक्षण अप्पर विशेष लेखापरीक्षक करीत असून, या लेखा परीक्षणात मोठा गैरव्यवहार/अफरातफर झाल्याचे तक्रारीवरुन पालकमंत्र्यांनी तहसिलदाराची चौकशी अधिकारी म्हणून नियुक्ती करून चौकशी सुरू केली आहे. त्यामुळे सचिव राजकुमार माळवे यांची प्रशासकीय कारकीर्द संशयास्पद आहे. अशा परिस्थितीत माळवे सचिव पदावर राहणे उचीत होणार नाही, असा आरोप तक्रारीत केला आहे. त्यामुळे संचालक मंडळाची विशेष सभा तात्काळ बोलवून सभेपुढे सचिव राजकुमार माळवे यांना पुढील आदेशापर्यंत तात्काळ निलंबित करावे, याशिवाय मागील अंकेक्षण अहवालात नमूद गंभीर प्रशासकीय व आर्थिक अनियमितता/गैरव्यवहार यांचा अभ्यास करुन याबाबत पोलिसांत फिर्याद देण्यासाठी दाखल करण्यासाठी तीन संचालकांची समिती बनवून त्यांना अधिकार प्रदान करण्यात यावे, या मुद्द्यावर चर्चा करुन ठराव घेण्यासाठी विशेष सभा बोलावण्यात यावी, अशी मागणी करीत लेखी तक्रारीचे पत्र पाच संचालकांनी सभापतींकडे दिले आहे.
-------------------------------
बाजार समिती संचालकाचे विशेष सभा घेण्यासाठी केलेल्या मागणी पत्रातील मुद्दे निहाय तक्रारीवरुन सचिवांना खुलासा मागविला आहे. खुलासा आल्यानंतर विशेष सभा बोलावण्यात येईल. त्यानंतर पुढील कार्यवाही निश्चित करण्यात येईल.
- भारतीताई गावंडे, सभापती बाजार समिती, अकोट.
-----------------
तक्रारी केलेले सर्व आरोप बिनबुडाचे आहे. त्या कुठलाही कायदेशीर आधार नाही. प्रत्येक आँडिटच वाचन संचालक मंडळाचे सभेसमोर झाले आहे. त्याला त्यांनी मान्यता दिली आहे.
- राजकुमार माळवे, सचिव बाजार समिती अकोट.