११ गावांत पाणीटंचाई निवारणाच्या कामांना प्रशासकीय मंजुरी!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 14, 2018 01:28 PM2018-12-14T13:28:48+5:302018-12-14T13:28:58+5:30
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला.
अकोला : जिल्ह्यातील बाळापूर आणि तेल्हा तालुक्यातील ११ गावांमध्ये पाणीटंचाई निवारणासाठी २४ लाख ७४ हजार ४०२ रुपयांच्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात येत असल्याचा आदेश जिल्हाधिकारी आस्तिककुमार पाण्डेय यांनी सोमवारी दिला. त्यामध्ये विंधन विहीर आणि कूपनलिकांच्या कामांचा समावेश आहे.
जिल्ह्यातील विविध भागात हिवाळ्यातच पाणीटंचाईचे चटके जाणवू लागले आहेत. त्यानुषंगाने जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागामार्फत प्राप्त प्रस्तावानुसार बाळापूर तालुक्यात एका गावात विंधन विहीर आणि तेल्हारा तालुक्यातील १० गावांत १० कूपनलिकांच्या कामांना जिल्हाधिकाºयांनी प्रशासकीय मंजुरी दिली आहे. २४ लाख ७४ हजार ४०२ रुपये खर्च अपेक्षित असलेल्या उपाययोजनांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी मिळाल्याने संबंधित ११ गावांमधील पाणीटंचाई निवारणाच्या कामांचा मार्ग मोकळा झाला आहे.
गावनिहाय मंजूर उपाययोजनांची अशी आहेत उपाययोजनांची कामे!
बाळापूर तालुक्यातील बारलिंगा या एका गावात एक विंधन विहीर उपाययोजनेच्या कामाला प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे, तर तेल्हारा तालुक्यातील माळेगाव बाजार, निंभोरा बु., निंभोरा खुर्द, सदरपूर, अकरमपूर, तुदगाव, तळेगाव डवला, तळेगाव वडनेर, बोरव्हा व कोठा या दहा गावांमध्ये कूपनलिकांच्या कामांना प्रशासकीय मंजुरी देण्यात आली आहे.
कामे १५ जोनवारीपर्यंत पूर्ण करण्याचा करण्याचा आदेश!
प्रशासकीय मंजुरी देण्यात आलेल्या पाणीटंचाई निवारणाची कामे १५ जानेवारीपर्यंत पूर्ण करून, ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची टंचाई भासणार नाही, याकडे लक्ष देण्याचा आदेशही जिल्हाधिकाºयांनी जिल्हा परिषद ग्रामीण पाणी पुरवठा विभागासह संबंधित यंत्रणांना दिला आहे.